रांजणगाव गणपतीच्या आदर्श शिक्षक संजयकुमार वाळके यांना ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार’
Rjnews27 मराठी
वैजापूर : पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, रांजणगाव गणपती येथील आदर्श शिक्षक संजयकुमार वाळके यांना जिजामाता बहुउद्देशीय संस्थेतर्फे ‘छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर येथील वनश्री हॉटेल सभागृहात झालेल्या कार्यक्रमात लातूर विभाग शिक्षण मंडळाच्या सचिव अनुपमा भंडारी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सूर्यकांत मोटे होते. छत्रपती शिवाजी महाराज व गणेश पूजन तसेच जिजाऊ वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी संदीप जाधव, माजी गट शिक्षण अधिकारी व बालकवी धोंडीरामसिंह राजपूत, मारुती देसाई, मान्यवर व पुरस्कारार्थी उपस्थित होते.
यावेळी अनुपमा भंडारी यांनी शिक्षकांनी प्रामाणिकपणे कार्य करत विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत चांगला माणूस घडविण्याचे संस्कार द्यावेत, असे आवाहन केले. संजयकुमार वाळके यांना यापूर्वी नेहरू युवा केंद्राचा युवा पुरस्कार तसेच संपर्क फाउंडेशनचा ‘टॉप टीचर अवॉर्ड’ मिळाला आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धोंडीराम राजपूत यांनी केले, तर आभार केदार मोटे यांनी मानले. पुरस्काराबद्दल शाळेच्या मुख्याध्यापिका संगिता पळसकर, केंद्रप्रमुख तानाजी पाटील, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष विवेकानंद फंड, उपाध्यक्ष रमाकांत शेळके, शालेय समिती अध्यक्ष प्रतिभा बत्ते व उपाध्यक्ष अक्षय गलांडे यांनी वाळके यांचे अभिनंदन केले.




