पुणे जिल्हा गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने विनोद शिंदे सन्मानित*

*पुणे जिल्हा गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्काराने विनोद शिंदे सन्मानित विद्याधाम हायस्कूलचे मुख्याध्यापक विनोद शिंदे यांना ‘पुणे जिल्हा गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’

 

Rjnews27 मराठी 

कान्हूर मेसाई : पुणे जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ, पुणे यांच्या वतीने प्रदान करण्यात येणारा ‘पुणे जिल्हा गुणवंत आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ यावर्षी विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, कान्हूर मेसाईचे मुख्याध्यापक विनोद शिंदे यांना प्रदान करण्यात आला.

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे सभागृह, पद्मावती, पुणे येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात पुणे जिल्हा माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी माननीय डॉ. भाऊसाहेब कारेकर यांच्या हस्ते विनोद शिंदे यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

शैक्षणिक गुणवत्ता वाढविणे, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविणे, शिक्षकांना सातत्याने प्रेरणा व मार्गदर्शन करणे, शाळेच्या शैक्षणिक प्रगतीसोबतच सामाजिक बांधिलकी जपणे आणि विद्यालयाच्या विकासासाठी विविध संस्था व समाजाच्या सहकार्याने उपक्रम राबविणे या कार्याची दखल घेऊन त्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.

विनोद शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून, इयत्ता बारावीच्या विज्ञान व वाणिज्य शाखेचा उत्कृष्ट निकाल, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षेतील यश तसेच विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा व सामाजिक उपक्रमांमध्ये विद्यालयाने उल्लेखनीय कामगिरी केली आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक शैक्षणिक संधी उपलब्ध व्हाव्यात, यासाठी ते सातत्याने प्रयत्नशील असतात.

या पुरस्कार वितरण समारंभास दैनिक सकाळचे सहयोगी संपादक महेश बर्दापूरकर, महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे सचिव नंदकुमार सागर, पुणे जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष प्रसाद गायकवाड, सचिव शिवाजी कामथे, कार्याध्यक्ष राजेश गायकवाड, उपाध्यक्ष कल्याण बरडे, विद्या सचिव भानुदास रिठे, विद्या समिती अध्यक्ष शिवाजी जगदाळे, कोषाध्यक्ष तबाजी वागदरे, पुणे शहर मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष शिवाजी शिंदे, कार्याध्यक्ष दिलीप काळे, सचिव किशोर बोरसे, हिशोबनीस तुकाराम बेनके, शिरूर तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष रामदास थिटे, सचिव बाळासाहेब चव्हाण, महाराष्ट्र राज्य आश्रमशाळा मुख्याध्यापक संघाचे उपाध्यक्ष डॉ. तुकाराम शिरसाट विद्याधाम हायस्कूलचे सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

पुरस्कार मिळाल्याबद्दल विनोद शिंदे यांचे विद्या विकास मंडळाचे पदाधिकारी, अध्यक्ष, सचिव, संचालक मंडळ, विद्यालयाचे पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, पालक, ग्रामस्थ तसेच शिरूर तालुक्यातील शिक्षण क्षेत्रातील विविध मान्यवरांनी अभिनंदन केले.

या पुरस्कारामुळे ग्रामीण भागातील विद्यालयाच्या शैक्षणिक कार्याला नवी ऊर्जा मिळाली असून, ‘गुणवत्ता विकास हाच आमचा ध्यास’ या ध्येयाने विद्यालयाची वाटचाल अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights