“तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल; पोलिसांनी इसमाला पकडले”

तडीपार आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल झालेल्या इसमाला पोलिसांनी पकडले

Rjnews27 मराठी – रमेश बनसोडे 

शिरूर : पुणे जिल्ह्यासह अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आलेला अजिम बशीर पटेल (वय ४२, रा. हुडको कॉलनी, शिरूर) हा तडीपारीचा आदेश झुगारून शिरूरमध्ये दाखल झाल्याचे पोलिसांच्या कारवाईत समोर आले. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

२८ ऑगस्ट रोजी दुपारी शिरूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांना अजिम पटेल हा तडीपार असतानाही शिरूर येथील हुडको कॉलनी परिसरातील आपल्या घरी आल्याची गोपनीय माहिती मिळाली. तो कुटुंबीयांना भेटण्यासाठी परिसरात आल्याचे समजताच पोलिसांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली.

 

यानंतर पोलीस पथकाने हुडको कॉलनी परिसरात जाऊन शोध घेतला असता अजिम पटेल हा त्याच्या राहत्या घराच्या परिसरात आढळून आला. पोलिसांनी त्याच्याकडे पुणे जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी सक्षम अधिकाऱ्यांची पूर्वपरवानगी घेतली आहे का, याबाबत विचारणा केली. त्यावेळी कोणतीही पूर्वपरवानगी घेतली नसल्याचे त्याने सांगितल्याचे पोलिसांनी नमूद केले.

 

पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन तडीपारीच्या आदेशाची पडताळणी केली. पुणे उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार अजिम पटेल याला १४ ऑक्टोबर २०२५ रोजी दोन वर्षांच्या कालावधीसाठी पुणे जिल्हा तसेच पुणे शहर व पिंपरी-चिंचवड परिसर आणि अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातून तडीपार करण्यात आले होते. असे असतानाही तो परवानगीशिवाय शिरूरमध्ये आल्याने तडीपारीच्या आदेशाचा भंग झाल्याचे पोलिसांच्या तपासात स्पष्ट झाले.

 

अजिम पटेल याच्याविरुद्ध यापूर्वीही शिरूर पोलीस ठाण्यात विविध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी पोलिस हवालदार संजु ज्ञानदेव जाधव यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास सहायक फौजदार साबळे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *