दौंडमध्ये AI तंत्रज्ञानाच्या वापरातून कथित आक्षेपार्ह फोटो प्रसारित; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

दौंडमध्ये AI तंत्रज्ञानाच्या वापरातून कथित आक्षेपार्ह फोटो प्रसारित; एकाविरुद्ध गुन्हा दाखल

प्रतिनिधी – विकास साळुंके 

दौंड : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाचा वापर करून एका हिंदू कार्यकर्त्याचा कथित विकृत व आक्षेपार्ह फोटो तयार करून प्रसारित केल्याच्या आरोपावरून दौंड पोलीस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीस नोटीस बजावून सोडले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

 

दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 627/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 353(2) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणी आनंद पृथ्वीराज मुनोत (वय 50, रा. शिवाजी चौक, दौंड) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.

 

फिर्यादीत नमूद केल्यानुसार, 25 ऑगस्ट 2026 रोजी आनंद मुनोत हे त्यांच्या घरी असताना त्यांचे मित्र अक्षय वाघमारे तेथे आले होते. दोघे इन्स्टाग्रामवरील रिल्स पाहत असताना @aar-baaaazz या अकाउंटवरून एका हिंदू कार्यकर्त्याचा कथित आक्षेपार्ह फोटो प्रसारित करण्यात आल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

 

फिर्यादीच्या आरोपानुसार, अभिषेक ठाकूर या कार्यकर्त्याचे मानवी डोके आणि कुत्र्याचे शरीर अशा स्वरूपात कथितपणे AI तंत्रज्ञानाच्या मदतीने छायाचित्र तयार करण्यात आले होते. या चित्राच्या पार्श्वभूमीवर प्रभू श्रीरामाशी संबंधित धार्मिक गीताचा वापर करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.

 

या प्रकारामुळे संबंधित व्यक्तीची प्रतिमा व प्रतिष्ठा मलीन करण्याचा प्रयत्न झाल्याचा तसेच धार्मिक भावना दुखावण्याची शक्यता निर्माण झाल्याचा दावा फिर्यादीने केला आहे. याशिवाय, सोशल मीडियावरील अशा प्रकारच्या आशयामुळे समाजात गैरसमज किंवा तणाव निर्माण होण्याची शक्यता असल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

 

या प्रकरणी अरबाझ अकबर सय्यद (रा. खाटीक गल्ली, दौंड) याच्याविरुद्ध दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संबंधित व्यक्तीला नोटीस बजावून सोडल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

 

दरम्यान, या प्रकरणातील आरोपांची सत्यता, संबंधित सोशल मीडिया अकाउंटचा वापर नेमका कोणी केला, तसेच कथित फोटो तयार व प्रसारित करण्यामागील नेमका उद्देश काय होता, याबाबतचा तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. त्यामुळे या प्रकरणातील पुढील तपासानंतरच वस्तुस्थिती अधिक स्पष्ट होणार आहे.

 

या प्रकरणाचा पुढील तपास श्रेणी पोलीस उपनिरीक्षक खाडे करीत आहेत.

 

टीप : वरील वृत्तातील आरोप हे फिर्यादीत नमूद केलेल्या माहितीनुसार आहेत. प्रकरणाचा तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेत आरोप सिद्ध होईपर्यंत संबंधित व्यक्तीला दोषी ठरविता येणार नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *