पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्या बदलीची मागणी; रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे धरणे आंदोलन
प्रतिनिधी : शाम जगताप
पुरंदर : नागरिकांच्या विविध मूलभूत व ज्वलंत प्रश्नांकडे प्रशासनाकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत पुरंदरच्या प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांची तात्काळ बदली करावी, अशी मागणी रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश सरचिटणीस विष्णूदादा भोसले यांनी केली. नागरिकांच्या प्रश्नांवर वेळेत निर्णय घेणे हे प्रशासनाचे कर्तव्य असताना अनेक प्रकरणे प्रलंबित ठेवली जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.
पुरंदर तालुक्यातील विविध प्रशासकीय कार्यालयांमध्ये प्रलंबित असलेल्या नागरिकांच्या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. २४ ऑगस्ट २०२६ रोजी पुरंदरच्या प्रांत कार्यालयासमोर रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने जाहीर धरणे आंदोलन करण्यात आले. प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश केदारी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले.
महसुली खटले निकालावर ठेवल्यानंतर त्यांचे वेळेत निकाल देण्यात यावेत, कलम १५५, कलम १४३ तसेच मामलेदार अॅक्टनुसार चालणारी प्रकरणे तातडीने निकाली काढावीत, जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी प्रलंबित असलेल्या प्रकरणांवर निर्णय घ्यावा, तसेच कुणबी व अनुसूचित जमातीचे दाखले तातडीने देण्यात यावेत, अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या.
दप्तर दिरंगाई कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी संबंधित कार्यालय प्रमुखांची असते. मात्र, अनेक नागरिक आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करूनही कार्यालयात वारंवार चकरा मारत आहेत. काही प्रकरणांमध्ये सुनावणीसाठी नोटीस देऊनही सुनावणी झालेली नाही, तर काही महसुली प्रकरणे दीर्घकाळ निकालाच्या प्रतीक्षेत असल्याचा दावा विष्णूदादा भोसले यांनी केला.
बेघर व भूमिहीन नागरिकांना घरकुलासाठी शासकीय जागा उपलब्ध करून द्यावी, भूमिहीन व बेघर नागरिकांचा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश करावा, तसेच पात्र नागरिकांना अंत्योदय प्राधान्य यादीत स्थान द्यावे, या मागण्याही आंदोलनादरम्यान करण्यात आल्या. फासेपारधी व लमाण वस्त्यांमधील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तातडीने सोडवावा, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय भूमी अभिलेख कार्यालयातील प्रलंबित प्रश्न, पंचायत समिती पुरंदरमधील नागरिकांच्या अडचणी, सासवड-कोडीत रस्त्याची दुरवस्था आणि नागरिकांवर सक्तीने बसविले जाणारे स्मार्ट मीटर यांसारख्या विविध प्रश्नांवरही आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले.
दि. १० ऑगस्ट २०२६ रोजी आंदोलनाबाबत प्रांत कार्यालयाला लेखी निवेदन देण्यात आले होते. मात्र आंदोलनाच्या दिवशी प्रांताधिकारी वर्षा लांडगे कार्यालयात उपस्थित असूनही त्यांनी आंदोलनाची दखल घेतली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. जबाबदार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून नागरिकांच्या आंदोलनाकडे अशा प्रकारे दुर्लक्ष होणे योग्य नसल्याचे सांगत रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने प्रांताधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीचा निषेध करण्यात आला.
प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांच्या कार्यकाळात प्रलंबित राहिलेल्या महसुली खटल्यांची तसेच जन्म-मृत्यू दाखल्यांशी संबंधित प्रकरणांची खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही विष्णूदादा भोसले यांनी केली. नागरिकांचे प्रश्न तातडीने सोडविले नाहीत तर विभागीय आयुक्त, पुणे विभाग व जिल्हाधिकारी पुणे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल. गरज पडल्यास मुंबईतील आझाद मैदान येथेही आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला.
या आंदोलनास रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष डॉ. सतीश केदारी, प्रदेश उपाध्यक्ष रविंद्र वालदे, जिल्हाध्यक्ष संतोषनाना डोळस, पुणे शहर अध्यक्ष किशोर पंडागळे, प्रदेश संघटक सचिव गोविंद जगताप, प्रदेश संपर्कप्रमुख स्टिवन जोसेफ, प्रदेश उपाध्यक्ष निलेश आगळे, प्रदेश सचिव शकुरभाई शेख, सत्तारभाई शेख, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष मंगेश सोनवणे, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सोनीताई जाधव, पारधी आघाडीचे नेते पुरुषोत्तम पवार, पुरंदर तालुका अध्यक्ष सुधीर शेलार यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सकाळी ११ वाजता सुरू झालेले हे धरणे आंदोलन सायंकाळी ५ वाजता स्थगित करण्यात आले. मात्र, नागरिकांच्या प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने कार्यवाही न केल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा रिपब्लिकन श्रमिक ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.




