शिरूरच्या राजकीय वाटचालीला दिशा देणारे स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या कार्याला मान्यवरांचा उजाळा

  प्रतिनिधी -अल्लाउद्दीन अलवी

शिरूर, दि. ११ : शिरूर तालुक्याचे वैभव आणि भारतीय जनता पक्षाला तालुक्यात नव्याने उभारी देणारे नेतृत्व म्हणून ओळखले जाणारे शिरूरचे माजी आमदार स्वर्गीय बाबूरावजी पाचर्णे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त तर्डोबाचीवाडी येथील शिवतारा कृषी पर्यटन येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी ह.भ.प. डॉ. सुदाम महाराज पानेगावकर (विश्वशांती केंद्र, आळंदी देवाची) यांचे प्रवचन झाले. कार्यक्रमास पुणे जिल्ह्यासह अहिल्यानगर जिल्ह्यातील पाचर्णे समर्थकांचा मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

स्व. बाबूराव पाचर्णे यांनी शिरूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी मोठे योगदान दिले. पक्षाची तालुक्यातील स्थिती तुलनेने मर्यादित असताना त्यांनी आपल्या संघटन कौशल्याच्या आणि जनसंपर्काच्या जोरावर पक्षाला बळकटी दिली. त्यांच्या कार्यकाळात तालुक्यात विविध विकासकामांना चालना मिळाली. त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कार्याच्या आठवणींना यावेळी मान्यवरांनी उजाळा दिला.

या कार्यक्रमास दौंड तालुक्याचे आमदार राहुलदादा कुल, शिरूर-हवेलीचे विद्यमान आमदार माऊली आबा कटके, माजी आमदार अशोक बापू पवार, पुणे जिल्हा भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद, तसेच शिरूर, पारनेर, श्रीगोंदा आणि दौंड तालुक्यातील आजी-माजी आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तालुकाध्यक्ष राहुलदादा पाचर्णे, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दादा पाटील फराटे, विद्या सहकारी बँकेचे संचालक महेश बापू ढमढेरे, शिरूर पंचायत समितीचे माजी सदस्य लक्ष्मण बापू फराटे, भारतीय जनता पक्षाचे माजी तालुकाध्यक्ष एकनाथ शेलार, घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक कैलासराव सोनवणे, सरपंच दीपाताई नागवडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस युवकचे उपाध्यक्ष महेंद्र नागवडे, माजी जिल्हाध्यक्ष किसान मोर्चा सचिन बापू मचाले, भारतीय जनता पक्षाचे युवक अध्यक्ष सिद्धेश्वर नांद्रे, उपाध्यक्ष सागर नाना फराटे, तालुकाप्रमुख आयटी सेल अल्लाउद्दीन अलवी, उपसरपंच अमोल शितोळे, माजी चेअरमन भाऊसाहेब थोरात, रामराव पाटील नागवडे, सोमनाथ नागवडे आदी मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती.

विकासकामांतून पाचर्णे साहेबांनी ठसा उमटविला : आमदार राहुल कुल

प्रसारमाध्यमांशी बोलताना दौंडचे आमदार राहुलदादा कुल यांनी स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या कार्याचा गौरव केला. विधानसभेच्या माध्यमातून त्यांनी शिरूर तालुक्यासाठी भरीव निधी उपलब्ध करून घेतला आणि विविध विकासकामांना चालना दिली. जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे लोकप्रतिनिधी म्हणून पाचर्णे साहेबांनी आपला वेगळा ठसा उमटविला, असे त्यांनी सांगितले.

स्वतःच्या ताकदीवर भाजपला शिरूरमध्ये उभारी : प्रदीप कंद

पुणे जिल्हा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रदीपदादा कंद यांनी स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या राजकीय प्रवासाचा आढावा घेतला. शिरूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाची ताकद जेमतेम असताना पाचर्णे साहेबांनी स्वतःच्या ताकदीवर पक्षाची संघटनात्मक बांधणी केली आणि तालुक्यात पक्षाचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी मोठे योगदान दिले, असे त्यांनी सांगितले.

पाचर्णे साहेबांना तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. गोपीनाथ मुंडे, केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, दादा पाटील फराटे तसेच तालुकाध्यक्ष भगवानराव शेळके यांच्यासह अनेक सहकाऱ्यांची साथ लाभली. या सर्वांच्या सहकार्यामुळे शिरूर तालुक्यात भारतीय जनता पक्षाच्या वाढीला मोठी उभारी मिळाली, असे कंद यांनी स्पष्ट केले.

चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त झालेल्या कार्यक्रमात स्व. बाबूराव पाचर्णे यांच्या सामाजिक, राजकीय आणि विकासाभिमुख कार्याच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमास पुणे तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातून मोठ्या संख्येने आलेल्या पाचर्णे समर्थकांनी उपस्थिती लावत आपल्या नेत्याला आदरांजली वाहिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *