ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानपूर्ण जीवनासाठी ‘केअर इकॉनॉमी’ सक्षम करण्यावर भर; पुण्यात राज्यस्तरीय कार्यशाळेत तज्ज्ञांचा सखोल विचारविनिमय
प्रतिनिधी – नवनाथ दोडके
पुणे : भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सक्षमीकरण विभागाच्या वतीने दि. २२ मे २०२६ रोजी आभासी पद्धतीने ‘एक सुव्यवस्थित केअर इकॉनॉमी (शुश्रूषा/काळजी अर्थव्यवस्था)’ या विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या कार्यशाळेच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यात ‘एक सुव्यवस्थित केअर इकॉनॉमी (काळजी अर्थव्यवस्था) निर्माण करणे’ या विषयावर राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन दि. ६ ऑगस्ट २०२६ रोजी पुणे येथे करण्यात आले.

सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे आणि महाराष्ट्र राज्य ज्येष्ठ नागरिक महासंघ यांच्या सहकार्याने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे यांच्या अधिनस्त सफाई कामगारांच्या मुला-मुलींची शाळा, येरवडा, पुणे येथील संकुलातील कार्यक्रम सभागृह क्रमांक २ मध्ये ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेस समाजकल्याण विभागाचे अधिकारी, विविध शासकीय विभागांचे प्रतिनिधी, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था आणि ज्येष्ठ नागरिकांच्या क्षेत्रात कार्य करणारे तज्ज्ञ उपस्थित होते.

कार्यशाळेचे उद्घाटन समाजकल्याण महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. त्यानंतर समाजकल्याण आयुक्तालयाच्या उपायुक्त (नाहसं) श्रीमती स्वाती इथापे यांनी प्रास्ताविक केले. वाढती ज्येष्ठ नागरिकांची संख्या, दिव्यांग व्यक्ती, बालके तसेच इतर काळजीची आवश्यकता असलेल्या घटकांना दर्जेदार, सुलभ आणि सर्वसमावेशक काळजी सेवा उपलब्ध करून देण्यासाठी ‘केअर इकॉनॉमी’ ही संकल्पना प्रभावीपणे विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यशाळेच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी मान्यवरांना स्मृतिचिन्हाऐवजी रोप भेट देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी प्रादेशिक उपायुक्त, समाजकल्याण, पुणे विभाग श्रीमती वंदना कोचुरे तसेच सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे श्री. विशाल लोंढे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, प्रतिनिधी आणि सहभागी उपस्थित होते.
कार्यशाळेच्या सुरुवातीस समाजकल्याण महाराष्ट्र राज्याच्या आयुक्त श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांनी मार्गदर्शन केले. विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था, तज्ज्ञ, शैक्षणिक संस्था आणि संबंधित भागधारक यांच्यात प्रभावी समन्वय निर्माण करून काळजी अर्थव्यवस्थेसाठी राज्यस्तरीय कृती आराखडा तयार करणे, धोरणात्मक सूचना संकलित करणे, उपलब्ध योजनांचे एकत्रीकरण करणे, रोजगाराच्या संधी वाढविणे तसेच गुणवत्तापूर्ण काळजी सेवा विकसित करणे, या उद्देशाने कार्यशाळेचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
ज्येष्ठांच्या आरोग्य व मानसिक स्वास्थ्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज
कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. मिलिंद सरदार, स्ट्रेस मॅनेजमेंट एक्स्पर्ट, माधवबाग तसेच श्रीमती सुकन्या मेजारी, लक्ष्मीबेन सुरजी फाउंडेशन (LSF), मुंबई, प्रादेशिक संसाधन व प्रशिक्षण केंद्र यांनी मार्गदर्शन केले.
ज्येष्ठ नागरिकांना गुणवत्तापूर्ण निवास, आरोग्य सेवा, मानसिक आधार, नियमित वैद्यकीय तपासणी, समुपदेशन, मनोरंजन, पोषक आहार, सुरक्षित वातावरण आणि सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर त्यांनी भर दिला. बदलत्या सामाजिक परिस्थितीचा विचार करून ज्येष्ठ नागरिकांसाठी नाविन्यपूर्ण सेवा, समुदाय आधारित काळजी व्यवस्था, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, विविध विभागांमधील समन्वय तसेच सार्वजनिक-खासगी भागीदारीच्या माध्यमातून काळजी अर्थव्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
वाढत्या वयाबरोबर ज्येष्ठ नागरिकांमध्ये मधुमेह, हृदयरोग, अल्झायमर, डिमेंशिया यांसारख्या आजारांसह विविध आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. बदलती जीवनशैली, अयोग्य आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, मानसिक तणाव आणि आरोग्यविषयक जनजागृतीचा अभाव यांसारख्या बाबींकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. ज्येष्ठ नागरिकांसाठी नियमित आरोग्य शिबिरे, योग, प्राणायाम, आरोग्यविषयक कार्यशाळा, समुपदेशन आणि निरोगी जीवनशैलीबाबत प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगण्यात आले.
ग्रामीण आणि शहरी भागातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या काही प्रमाणात वेगळ्या असल्याने स्थानिक गरजेनुसार काळजी सेवा विकसित करण्याची गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.
तीन पॅनेलमध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर सखोल चर्चा
‘केअर इकॉनॉमी’ या विषयावर सखोल विचारविनिमय करण्यासाठी कार्यशाळेत तीन स्वतंत्र पॅनेलची स्थापना करण्यात आली. या पॅनेलमध्ये श्री. जयवंत मंत्री, श्री. भूषण जोशी, श्री. भरत गायकवाड (जनसेवा फाउंडेशन, पुणे), श्री. राजीव कुलकर्णी (हेल्पएज इंडिया), श्री. नितीन घाटगे (स्कूल फाउंडेशन, पुणे), श्री. अरुण रोडे (फेसकॉम, पुणे), श्री. महेश ठाकूर (कर्वे समाजकार्य महाविद्यालय), श्री. विजय हायकर (असोसिएशन ऑफ सिनिअर लिव्हिंग इंडिया – ASLI), डॉ. गीता शिंदे (प्राध्यापक, पुणे विद्यापीठ) आणि डॉ. नंदकुमार साळुंके (सहायक प्राध्यापक, ससून हॉस्पिटल, पुणे) आदी तज्ज्ञांनी आपले विचार व सूचना मांडल्या.
चर्चेदरम्यान ज्येष्ठ नागरिकांच्या सर्वांगीण काळजीसंदर्भात विविध मुद्द्यांवर सविस्तर विचारमंथन करण्यात आले. ज्येष्ठांना सन्मानपूर्वक, सुरक्षित आणि गुणवत्तापूर्ण जीवन जगता यावे, यासाठी आवश्यक काळजी सेवा अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला.
प्रशिक्षित ‘केअरगिव्हर’ आणि डे-केअर सेंटर उभारण्याची गरज
ज्येष्ठ नागरिकांच्या काळजीसाठी प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम राबविणे, ‘केअरगिव्हर’ तयार करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण विकसित करणे तसेच समुदाय स्तरावर डे-केअर सेंटरची स्थापना करण्याबाबत चर्चा झाली.
डे-केअर सेंटरच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना आरोग्य सेवा, समुपदेशन, मनोरंजन, सामाजिक सहभाग आणि पुनर्वसनाच्या सुविधा उपलब्ध करून देता येतील, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. बदलत्या काळानुसार ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा व आव्हानेही बदलत असल्याने ज्येष्ठांनीही बदलत्या परिस्थितीशी जुळवून घेत स्वावलंबी दृष्टिकोन स्वीकारण्याची गरज असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, गरजा आणि त्यांच्याविषयी संवेदनशीलता निर्माण करण्यासाठी हा विषय शालेय शिक्षणाच्या स्तरावर समाविष्ट करण्याची सूचना करण्यात आली. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, सेवा, सुविधा आणि आवश्यक माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र पोर्टल किंवा संकेतस्थळ विकसित करण्याबाबतही सूचना मांडण्यात आल्या.
सायबर गुन्ह्यांपासून ज्येष्ठांच्या संरक्षणावर भर
ज्येष्ठ नागरिकांच्या सामाजिक व मानसिक आरोग्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज यावेळी अधोरेखित करण्यात आली. मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी ‘मेंटल जिम’, समुपदेशन आणि जनजागृती कार्यक्रम राबविण्याची आवश्यकता व्यक्त करण्यात आली.
तसेच वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून ज्येष्ठ नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सायबर सुरक्षा विषयक प्रशिक्षण व जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्याबाबत चर्चा झाली. पोलीस स्टेशन स्तरावर ज्येष्ठ नागरिकांशी सन्मानपूर्वक, संवेदनशील आणि न्याय्य वर्तन करण्यात यावे, त्यांच्या तक्रारींवर प्राधान्याने कार्यवाही करून आवश्यक सहकार्य व संरक्षण उपलब्ध करून द्यावे, अशी सूचनाही करण्यात आली.
यानंतर सहभागी प्रतिनिधींसाठी प्रश्नोत्तरांचे सत्र घेण्यात आले. या सत्रात उपस्थितांनी विविध प्रश्न उपस्थित करून आपले अनुभव व सूचना मांडल्या. तज्ज्ञांनी उपस्थितांच्या प्रश्नांना मार्गदर्शन करत ज्येष्ठ नागरिकांच्या काळजी व्यवस्थेबाबत आवश्यक उपाययोजनांची माहिती दिली.
शासकीय योजनांची माहिती देत कार्यशाळेची सांगता
कार्यशाळेच्या समारोपाच्या टप्प्यात श्री. राधाकिसन देवढे, समाजकल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, पुणे यांनी ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजना, सेवा व सुविधांची माहिती दिली. त्यानंतर श्री. विशाल लोंढे, सहायक आयुक्त, समाजकल्याण, पुणे यांनी उपस्थित मान्यवर, तज्ज्ञ, अधिकारी, विविध विभागांचे प्रतिनिधी आणि सहभागी यांचे आभार मानले.
ज्येष्ठ नागरिकांसह काळजीची आवश्यकता असलेल्या विविध घटकांना सुरक्षित, सन्मानपूर्ण, दर्जेदार आणि सर्वसमावेशक सेवा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील विविध यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याची आवश्यकता या राज्यस्तरीय कार्यशाळेतून अधोरेखित झाली. प्रशिक्षित मनुष्यबळ, समुदाय आधारित काळजी सेवा, आरोग्य व मानसिक आरोग्य सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर आणि शासकीय योजनांचे एकत्रीकरण या माध्यमातून महाराष्ट्रात सक्षम ‘केअर इकॉनॉमी’ उभारण्याच्या दिशेने या कार्यशाळेला महत्त्वपूर्ण व्यासपीठ मिळाले.




