हातवळणच्या शाळेसाठी ग्रामस्थांची एकजूट!पुण्यस्मरणातून शिक्षणक्रांतीचा संकल्प; सतीश (अण्णा) वाबळे यांनी मांडला लोकसहभागातून शाळा परिवर्तनाचा अनुभव

 

 

राजकारणाचे जोडे शाळेबाहेर ठेवून शाळेच्या विकासासाठी एकत्र या’; AI, रोबोटिक्ससह आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधांसाठी लोकसहभागाचे आवाहन

 

प्रतिनिधी – विजय कांबळे 

 

नागरगाव – हातवळण, ता. दौंड : पुण्यस्मरणाला समाजप्रबोधनाची आणि शिक्षणविकासाची जोड देत हातवळण येथील जिल्हा परिषद शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांना एकत्र आणण्याचा प्रेरणादायी उपक्रम नुकताच पार पडला. कै. सुभद्रा ज्ञानोबा राऊत यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त ‘पुण्यस्मरणातून शिक्षणक्रांतीचा संकल्प’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सतीश (अण्णा) वाबळे यांनी लोकसहभागातून शाळा परिवर्तनाचा आपला अनुभव मांडत हातवळणच्या शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकजुटीने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

 

दत्तात्रय वारे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली वाबळेवाडी येथील शाळा व्यवस्थापन समितीत काम करताना आलेला अनुभव सतीश वाबळे यांनी यावेळी सांगितला. वाबळेवाडी तसेच जालिंदरनगर येथील शाळांमध्ये ग्रामस्थांच्या सक्रिय सहभागातून झालेल्या शैक्षणिक परिवर्तनाचे उदाहरण देत शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी गावाचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

ते म्हणाले, “जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवायच्या असतील आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य सुरक्षित करायचे असेल, तर केवळ सरकारवर अवलंबून राहून चालणार नाही. गावाने आपल्या शाळेची जबाबदारी स्वीकारली, तर लोकसहभागातून शाळेला नवी दिशा देता येईल.”

 

गावातील अनावश्यक खर्चाला आळा घालून त्यातून काही निधी शाळेच्या विकासासाठी वापरण्याचे आवाहन करताना वाबळे यांनी विद्यार्थ्यांना काळानुरूप शिक्षण मिळण्यासाठी संगणक, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), रोबोटिक्स आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या सुविधा शाळेत उपलब्ध करून देण्याची गरज व्यक्त केली. लोकसहभागातून अनेक शाळांचे रूपडे बदलू शकते, याची उदाहरणेही त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.

 

राजकीय मतभेद बाजूला ठेवून शाळेसाठी एकत्र येण्याचे आवाहन

 

सतीश वाबळे यांच्या मार्गदर्शनानंतर राऊत कुटुंबीयांनी ‘राजकारणाचे जोडे शाळेबाहेर ठेवून’ शाळेच्या विकासासाठी ग्रामस्थांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत हातवळणचे सरपंच रमेशमामा जगताप आणि कात्रज डेअरीचे संचालक सागरदादा फडके यांनी शाळेच्या विकासासाठी एकत्रितपणे काम करण्याची ग्वाही दिली.

 

विशेष म्हणजे विविध राजकीय विचारांचे स्थानिक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्तेही या उपक्रमाच्या निमित्ताने शाळेच्या विकासासाठी एकत्र आले. त्यामुळे शिक्षणाच्या प्रश्नावर राजकीय मतभेद बाजूला ठेवून गावाची एकजूट करण्याचा सकारात्मक संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

 

AI व रोबोटिक्स लॅबसाठी २१ हजारांची देणगी

 

कार्यक्रमात सतीश (अण्णा) वाबळे यांचा स्मृतिचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. तसेच हातवळण जिल्हा परिषद शाळेत नियोजित AI व रोबोटिक्स लॅबसाठी लोकसहभागातून निधी संकलनाचा शुभारंभ करण्यात आला.

 

राऊत कुटुंबीयांच्या वतीने नियोजित AI व रोबोटिक्स लॅबसाठी ₹२१ हजारांचे योगदान देण्यात आले. या देणगीचा धनादेश शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शितोळे यांनी ग्रामस्थांनी शाळेच्या विकासात सक्रिय सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी योगदान देण्याचे आवाहन केले.

 

लोकसहभागातून शाळेचा भौतिक तसेच शैक्षणिक विकास साधत विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाशी जोडण्याचा संकल्प या कार्यक्रमातून करण्यात आला. पुण्यस्मरणाचा कार्यक्रम सामाजिक बांधिलकी आणि शिक्षणविकासाच्या विधायक उपक्रमात रूपांतरित झाल्याने उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

 

मान्यवरांची उपस्थिती

 

कार्यक्रमास हातवळणचे सरपंच रमेशमामा जगताप, विष्णुपंत कोऱ्हाळे, कात्रज डेअरीचे संचालक सागरदादा फडके, राष्ट्रवादी काँग्रेसचे गडसंवर्धन तालुका उपाध्यक्ष सर्जेराव गरदडे, भाजपा महिला मोर्चाच्या पुणे उपाध्यक्ष निर्मला केसवड, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत शितोळे, सदस्य मंगेश दादा फडके, मुख्याध्यापक बाळासाहेब आढागळे, शिक्षकवृंद, ग्रामस्थ, पालक, विद्यार्थी, शिक्षणप्रेमी, नातेवाईक व आप्तेष्ट मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *