शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून युवकांनी पालक-गुरूंचा अभिमान वाढवावा : शिवचरित्रकार प्रा. यशवंत गोसावी

मल्लिकार्जुन विद्यालयात शिवचरित्रकार प्रा. यशवंत गोसावी यांच्या प्रेरणादायी व्याख्यानमालेचे आयोजन

विजय कांबळे – प्रतिनिधी

न्हावरे (ता. शिरूर) : अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जाती-धर्मातील युवा मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्याची स्थापना केली आणि सामान्य जनतेला न्याय मिळवून दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आजच्या युवकांनी आपल्या जीवनात कठोर परिश्रम, शिस्त आणि ध्येयवेड जोपासत आपल्या आई-वडिलांसह गुरूजनांना अभिमान वाटेल, असे कर्तृत्व घडवावे, असे आवाहन शिवचरित्रकार प्रा. यशवंत गोसावी यांनी केले.

न्हावरे (ता. शिरूर) येथील श्री मल्लिकार्जुन विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या शिवचरित्रावरील व्याख्यानमालेत प्रा. गोसावी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब भालेराव होते.

यावेळी किसान युवा क्रांती संघटनेचे शिरूर तालुका उपाध्यक्ष संभाजीराव कांडगे, ग्रामपंचायत सदस्य समीर कोरेकर, पर्यवेक्षक चांगदेव होलगुंडे, तंटामुक्ती समितीचे माजी अध्यक्ष बापूसाहेब काळे, विकास भगत, भरत गावडे, सुनील ठिकेकर, गणेश कांडगे आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रा. यशवंत गोसावी यांनी आपल्या व्याख्यानातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनकार्याचा आणि त्यांच्या संघर्षमय वाटचालीचा विद्यार्थ्यांना परिचय करून दिला. कठोर परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि योग्य ध्येयाशिवाय जीवनात यश मिळू शकत नाही. युवकांनी आपल्या वागणुकीमुळे आई-वडिलांची मान खाली जाणार नाही, याचे भान ठेवले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

आजच्या डिजिटल युगात विद्यार्थी मोठ्या प्रमाणात मोबाईलच्या आहारी जात असल्याचे चित्र आहे. मोबाईलमध्ये अधिक वेळ न घालवता विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करावी, नियमित वाचनातून ज्ञान मिळवावे आणि आपल्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करावा, असा सल्लाही प्रा. गोसावी यांनी दिला.

शालेय विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्याची जबाबदारी केवळ शिक्षकांची नसून पालकांचीही तितकीच महत्त्वाची आहे. विद्यार्थ्यांमध्ये चांगले संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि देशप्रेमाची भावना निर्माण करण्यासाठी शिक्षक व पालकांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे. समाजातील अन्याय आणि अत्याचाराविरोधात आवाज उठवून सकारात्मक परिवर्तन घडविण्याची ताकद युवकांमध्ये आहे. त्यामुळे युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन समाजहितासाठी कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या व्याख्यानमालेचे आयोजन अजीत गावडे व सुनील ठिकेकर यांनी केले. कार्यक्रमाचे स्वागत संजय गायकवाड यांनी केले, तर आभार गणेश गायकवाड यांनी मानले. विद्यार्थ्यांनी व उपस्थित मान्यवरांनी प्रा. गोसावी यांच्या प्रेरणादायी व्याख्यानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *