शिरूर,Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे
शिरूर शहरातील बाबुराव नगर परिसरातील कोळपे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये हाताच्या फ्रॅक्चरच्या शस्त्रक्रियेदरम्यान २८ वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. पूजा राहुल गई असे मृत महिलेचे नाव असून, त्यांच्या मृत्यूबाबत पती राहुल गई यांनी उपचारादरम्यान डॉक्टरांकडून निष्काळजीपणा झाल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शवविच्छेदन अहवाल आणि पोलिस तपासानंतरच या घटनेमागील वस्तुस्थिती समोर येणार आहे.

पूजा गई या रांजणगाव गणपती येथे पती आणि मुलासह राहत होत्या. त्या मूळच्या बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथील असल्याची माहिती आहे. ४ ऑगस्ट रोजी दुचाकीवरून तोल जाऊन पडल्याने त्यांच्या उजव्या हाताच्या कोपराला दुखापत झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील कोळपे मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल केले.
रुग्णालयात करण्यात आलेल्या सीटी स्कॅन आणि एक्स-रे तपासणीत हाताच्या हाडाला फ्रॅक्चर झाल्याचे निदान झाल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेचा सल्ला दिल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. त्यानुसार ५ ऑगस्ट रोजी पूजा यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर ६ ऑगस्ट रोजी सकाळी सुमारे ११ वाजता त्यांच्या हाताच्या फ्रॅक्चरची शस्त्रक्रिया सुरू करण्यात आली.
मात्र, शस्त्रक्रिया सुरू झाल्यानंतर काही वेळाने ऑपरेशन थिएटरच्या परिसरात गडबड जाणवत असल्याचे पती राहुल गई यांनी सांगितले. त्यांनी ऑपरेशन थिएटरचा दरवाजा ठोठावला; मात्र त्यांना प्रतिसाद मिळाला नसल्याचा त्यांचा आरोप आहे. त्यानंतर सुमारे तीन तासांनी, दुपारी दोनच्या सुमारास डॉक्टरांनी पूजा यांचा मृत्यू झाल्याची माहिती दिल्याचे राहुल गई यांनी सांगितले.
हाताच्या फ्रॅक्चरवरील शस्त्रक्रियेसाठी रुग्णालयात दाखल केलेल्या पत्नीचा अचानक मृत्यू कसा झाला, असा सवाल राहुल गई यांनी उपस्थित केला आहे. शस्त्रक्रियेदरम्यान नेमकी कोणती वैद्यकीय गुंतागुंत निर्माण झाली? भूल देण्याच्या प्रक्रियेदरम्यान काही अडचण निर्माण झाली होती का? रुग्णाच्या प्रकृतीमध्ये अचानक कोणता बदल झाला? उपचारादरम्यान वैद्यकीय निष्काळजीपणा झाला का? अथवा मृत्यूमागे अन्य कोणते वैद्यकीय कारण होते? या सर्व बाबींची चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी कुटुंबीयांकडून करण्यात आली आहे.
पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद
या घटनेनंतर नातेवाईकांनी डॉक्टरांच्या उपचारपद्धतीबाबत संशय व्यक्त करत शिरूर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पुणे येथील ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
शवविच्छेदनाची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने करण्याच्या दृष्टीने ती कॅमेऱ्यासमोर करण्याच्या सूचना संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांना देण्यात आल्याची माहिती आहे. शवविच्छेदन अहवालात मृत्यूचे वैद्यकीय कारण काय नमूद होते, तसेच पोलिस तपासात कोणती माहिती समोर येते, यावर पुढील कारवाई अवलंबून राहणार आहे.
कुटुंबाचा आधार गमावल्याने पती भावुक
पूजा यांच्या अचानक मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबावर मोठे संकट कोसळले आहे. पूजा यांच्या मुलाला किडनीच्या आजाराचा त्रास असल्याचे पती राहुल गई यांनी सांगितले. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद येथून उदरनिर्वाहासाठी रांजणगाव परिसरात आल्यानंतर येथे जवळचे नातेवाईक किंवा आधार नसताना पत्नीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबाचा मोठा आधारच हिरावला गेल्याचे सांगताना राहुल गई भावुक झाले.
निष्पक्ष चौकशीची मागणी
या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी, तसेच वैद्यकीय निष्काळजीपणा आढळल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी राहुल गई यांनी केली आहे. सामाजिक कार्यकर्ते सुशांत कुटे यांनीही शवविच्छेदनाचा अहवाल पारदर्शक आणि निष्पक्ष पद्धतीने समोर यावा, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणात डॉक्टरांकडून नेमकी कोणती चूक झाली किंवा मृत्यूमागे वैद्यकीय गुंतागुंत अथवा अन्य कारण होते, याबाबत सध्या कोणताही अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. शवविच्छेदन अहवाल, वैद्यकीय कागदपत्रे आणि पोलिस तपासातूनच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्व बाजूंची अधिकृत माहिती समोर आल्यानंतरच या प्रकरणातील वस्तुस्थिती स्पष्ट होण्याची शक्यता आहे.




