पिंपरी दुमाला गावचे शांततेचे पोलिस निरीक्षकांकडून कौतुक*पोलिसांच्या गस्तीसोबत ग्रामस्थांनीही रात्रीची गस्त वाढवावी’; कुमार कदम यांचे आवाहन
प्रतिनिधी: Rjnews 27 मराठी
पिंपरी दुमाला : ग्रामीण संस्कृतीची नाळ जपणाऱ्या आणि कृषीप्रधान म्हणून ओळख असलेल्या पिंपरी दुमाला गावाला रांजणगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी भेट देत गावातील सामाजिक, सांस्कृतिक व सुरक्षाविषयक परिस्थितीचा आढावा घेतला. गावातील फळबागा, कांदा उत्पादन, ग्रामीण जीवनशैली तसेच महाशिवरात्री आणि श्रावण महिन्यात सोमेश्वर देवस्थान परिसरात होणारी भाविकांची गर्दी याबाबत त्यांनी ग्रामस्थांकडून माहिती जाणून घेतली.
शिरूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरीच्या घटना घडत असताना नागरिकांनी अधिक सतर्क राहण्याची गरज असल्याचे कदम यांनी सांगितले. पोलिसांकडून परिसरात नियमित गस्त सुरू असून, त्यासोबतच ग्रामस्थांनीही रात्रीच्या वेळी सामूहिक गस्त वाढवून आपल्या गावाच्या सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
गावात संशयास्पद व्यक्ती अथवा हालचाली आढळल्यास नागरिकांनी तत्काळ पोलिसांना माहिती द्यावी. रात्रीच्या वेळी किंवा अडचणीच्या ठिकाणी कोणतीही समस्या निर्माण झाल्यास ११२ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधून पोलिसांची मदत घेता येते, याबाबतही त्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.
महाविद्यालयीन मुली व महिलांच्या सुरक्षेचा मुद्दाही यावेळी चर्चेत आला. मुलींना जाणवणारी भीती दूर करण्यासाठी तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविण्याबाबत पोलिस प्रशासनाकडून योग्य ती कार्यवाही करण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले.
१९९४-९५ मध्ये घडलेल्या दरोड्याच्या घटनेनंतर आजपर्यंत पिंपरी दुमाला गावात गंभीर स्वरूपाचा गुन्हा अथवा गैरप्रकार घडलेला नसल्याची बाब यावेळी विशेषत्वाने नमूद करण्यात आली. गावातील शांतता, सामाजिक सलोखा आणि सुरक्षिततेची ही परंपरा कायम ठेवण्यासाठी पोलिस प्रशासनासोबत ग्रामस्थांनीही सजग राहण्याचे आवाहन करण्यात आले.
पिंपरी दुमाला हे कृषीप्रधान गाव असून येथे मोठ्या प्रमाणावर फळबागा आणि कांदा उत्पादन घेतले जाते. गावाची ग्रामीण संस्कृती, धार्मिक परंपरा आणि सामाजिक एकोपा याबाबतही पोलिस निरीक्षक कदम यांनी कौतुक व्यक्त केले. महाशिवरात्री तसेच श्रावण महिन्यात सोमेश्वर देवस्थान येथे होणाऱ्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व वाहतूक व्यवस्थेबाबतही यावेळी चर्चा झाली.
या वेळी सरपंच महेंद्र डोळस, माजी उपसरपंच शरद खळदकर, देवस्थान समितीचे अध्यक्ष श्रीकांत सोनवणे, माजी देवस्थान अध्यक्ष सुनील सोनवणे, देवस्थान उपाध्यक्ष कैलास पिंगळे, खजिनदार शेखर पाटेकर, पोलिस पाटील संतोष जाधव, ग्रामपंचायत सदस्य अमोल डोळस, माजी उपसरपंच अशोक दुर्गे, बागायतदार कांतीलाल माशेरे, सोमनाथ चिखले, देवस्थान पुजारी सोमनाथ तक्ते, सुभाष बापू डोळस, कारेगाव पोलिस ठाण्याच्या गोपनीय कक्षाचे ब्रह्मा पवार यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते




