Rjnews 27 मराठी – विकास साळुंके
पुणे ग्रामीण जिल्ह्यातील यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत अल्पवयीन मुलींचा पाठलाग करून त्यांच्याशी गैरवर्तन व विनयभंग केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १२ वर्षे १० महिने वयाच्या अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून प्रविण गणपत थोरात व दिनेश दत्तात्रय पासलकर (दोघेही रा. खुटबाव, ता. दौंड, जि. पुणे) यांच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादीनुसार, २० जुलै २०२६ रोजी तसेच २७ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास पारगाव (ता. दौंड) येथील चौक परिसरात फिर्यादी व तिची बहिण शाळेतून घरी जात असताना आरोपी त्यांच्या ताब्यातील इको (एमएच ४२ बीएस ८५३५) या वाहनातून आले. त्यांनी मुलींचा पाठलाग करून वाहन आडवे लावले. त्यानंतर आरोपी क्रमांक एक याने अल्पवयीन मुलीचा हात पकडून तिला जवळ ओढत “तू मला खूप आवडतेस” असे म्हणत तिच्या मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच आरोपी क्रमांक दोन याने फिर्यादीच्या बहिणीचा हात धरून तिलाही जबरदस्तीने अंगाकडे ओढल्याचा आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी २८ जुलै २०२६ रोजी रात्री ९.०७ वाजता यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत २९ जुलै २०२६ रोजी सकाळी ९.०७ वाजता दोन्ही आरोपींना अटक केली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किशोर वागज यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून गुन्ह्याची नोंद सहायक पोलीस निरीक्षक सुवर्णा गोसावी यांनी केली आहे.
टीप : या प्रकरणातील पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने तिची ओळख उघड होणार नाही, याची माध्यमांनी व नागरिकांनी विशेष खबरदारी घेणे आवश्यक आहे.




