NHM कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी राज्य शासनाची अंतिम मुदत जाहीर

NHM कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! १० वर्षे सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनासाठी राज्य शासनाची अंतिम मुदत जाहीर

Rjnews 27 मराठी रमेश बनसोडे 

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजन प्रक्रियेला अखेर वेग आला असून राज्य शासनाने ही प्रक्रिया निश्चित कालमर्यादेत पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ३० जून २०२६ रोजीच्या शासन निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आरोग्य सेवा तथा अभियान संचालकांनी सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक तसेच संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.

राज्यभरातील सर्व पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाची प्रक्रिया एकसमान, पारदर्शक आणि वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी शासनाने टप्प्याटप्प्याने कामकाजाचे वेळापत्रक निश्चित केले आहे. या प्रक्रियेत कोणताही विलंब अथवा त्रुटी होऊ नये, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिक जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

पहिला टप्पा : पात्रता यादी तयार करण्याचे आदेश

शासनाच्या निर्देशानुसार राज्य, जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगर परिषद तसेच इतर नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सलग १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवेची सखोल पडताळणी करावी. त्यानंतर नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली पात्रता यादी तयार करून तिची हार्ड कॉपी आणि सॉफ्ट कॉपी २४ जुलै २०२६ पर्यंत राज्य कार्यालयात सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

दुसरा टप्पा : अंतरिम पात्रता यादी प्रसिद्ध होणार

राज्यस्तरावरून प्राप्त झालेल्या माहितीची पडताळणी झाल्यानंतर नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी २७ जुलै २०२६ रोजी आपल्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डावर अंतरिम पात्रता यादी प्रसिद्ध करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

तिसरा टप्पा : हरकती व आक्षेप स्वीकारले जाणार

अंतरिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतर संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांना ३१ जुलै २०२६ पर्यंत हरकती, आक्षेप किंवा आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची संधी दिली जाणार आहे. पात्र कर्मचाऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि प्रत्येकाला न्याय्य संधी मिळावी, हा यामागील उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

चौथा टप्पा : अंतिम पात्रता यादी प्रसिद्ध

प्राप्त झालेल्या हरकतींची छाननी करून आवश्यक बदल करण्यात येतील. त्यानंतर नियुक्ती प्राधिकाऱ्यांनी प्रमाणित केलेली अंतिम पात्रता यादी ७ ऑगस्ट २०२६ पर्यंत प्रसिद्ध करावी. तसेच ८ ऑगस्टपर्यंत अंतिम यादीची हार्ड कॉपी व सॉफ्ट कॉपी राज्य कार्यालयात विशेष दूतामार्फत पाठविण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

राज्यभर एकसमान प्रक्रिया

या संपूर्ण प्रक्रियेमुळे राज्यातील हजारो पात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवा समायोजनाचा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच निकषावर प्रक्रिया राबवून पारदर्शकता राखण्यावर शासनाने विशेष भर दिला आहे.

जबाबदारी निश्चित

शासनाने स्पष्ट इशारा दिला आहे की, सेवा समायोजन प्रक्रियेत कोणताही विलंब, निष्काळजीपणा किंवा त्रुटी आढळल्यास संबंधित नियुक्ती प्राधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल. त्यामुळे सर्व विभागांनी शासनाच्या वेळापत्रकानुसार काटेकोरपणे कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *