शिरूर | रमेश बनसोडे
दिल्ली येथील जंतरमंतरवर सुरू असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी तसेच NEET परीक्षा घोटाळा, विद्यार्थ्यांवरील अन्याय आणि आंदोलनकर्त्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ शिरूर शहरात गुरुवारी समस्त शिरूरकरांच्या वतीने भव्य, शांततापूर्ण लाँग मार्च काढण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते व शास्त्रज्ञ सोनम वांगचुक तसेच कॅम्पेन फॉर जस्टिस अँड पीसचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला ऐक्य दर्शवत शहर बंदचीही हाक देण्यात आली होती.

लाँग मार्चची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाच्या जयघोषांनी झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन करून मोर्चाला प्रारंभ करण्यात आला. पुणे-नगर महामार्गावरील प्रमुख मार्गाने तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या या मोर्चात ‘भारत माता की जय’, ‘वंदे मातरम्’ आणि ‘जय भीम’ अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

मोर्चामध्ये विद्यार्थी, पालक, शिक्षक, डॉक्टर, वकील, महिला, सामाजिक कार्यकर्ते तसेच विविध क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने सहभागी झाले होते. आंदोलकांनी शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांच्याकडे आपल्या विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

निवेदनामध्ये NEET परीक्षेतील कथित पेपरफुटी, विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आणि शिक्षण व्यवस्थेतील गंभीर त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक, निष्पक्ष आणि विश्वासार्ह करण्याची मागणी करण्यात आली. तसेच नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तातडीने राजीनामा द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
याशिवाय शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचा निषेध करत या घटनेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच संविधानाने दिलेल्या शांततापूर्ण आंदोलनाच्या अधिकारांचे संरक्षण करण्यात यावे, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
या लाँग मार्चमध्ये माजी आमदार अशोक पवार, माजी नगरसेवक रविंद्र धनक, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. स्वप्निल भालेकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर, डॉक्टर, सामाजिक कार्यकर्ते, महिला, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
मोर्चा पूर्णपणे शांततेत आणि कायद्याचे पालन करून पार पडला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शिरूर पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील व्यापारी आणि नागरिकांनीही स्वयंस्फूर्तीने पाठिंबा दर्शविला.




