हरित महाराष्ट्राचा संदेश केडगावात ३०० वृक्षांचे वृक्षारोपण; राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त सहभाग
केडगाव (प्रतिनिधी): विकास साळुंके
उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त केडगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने भव्य वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. पुणे जिल्हा परिषद सदस्य तुषार थोरात व पंचायत समिती सदस्य धनंजय शेळके यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमात एकूण ३०० वृक्षांची लागवड करण्यात आली.
या वृक्षारोपण कार्यक्रमाचा शुभारंभ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या वैशाली नागवडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पर्यावरणाचे संरक्षण आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षसंवर्धनाचे महत्त्व उपस्थितांनी अधोरेखित केले.
कार्यक्रमानंतर बोलताना पंचायत समिती सदस्य धनंजय शेळके यांनी सांगितले की, अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक बांधिलकी जपत हा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला असून, या मोहिमेत ३०० झाडांची लागवड करण्यात आली आहे. लावण्यात आलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याची जबाबदारीही कार्यकर्त्यांकडून स्वीकारण्यात आली असून, भविष्यातही अशा पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नितीन दोरगे, केडगावच्या सरपंच पूनम बारवकर, पंचायत समिती सदस्य प्रदीप दिवेकर, पाराजी हंडाळ, बाळासाहेब कापरे, दिलीप हंडाळ, सागर फडके, झुंबर गायकवाड, सुनील निंबाळकर, सचिन शिळके, गौरव बारवकर, स्वप्नील राऊत, संतोष शेळके यांच्यासह तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी, नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थितांनी वृक्षारोपणासोबतच वृक्षसंवर्धनाची शपथ घेत पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक प्रयत्न करण्याचा निर्धार व्यक्त केला. सामाजिक उत्तरदायित्वाची जाणीव ठेवून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे परिसरातील नागरिकांकडूनही स्वागत करण्यात आले.




