जि.प. प्राथमिक शाळा कौठीचा मळा येथे बालदिंडी सोहळा उत्साहात; ज्ञानोबा-तुकारामांच्या जयघोषाने परिसर भक्तिमय
दौंड प्रतिनिधी : संजय चव्हाण
आषाढी एकादशी निमित्त शनिवार, दि. 18 जुलै 2026 रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, कौठीचा मळा ता दौंड येथे बालदिंडी सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात पार पडला. “ज्ञानोबा-तुकाराम” तसेच “पांडुरंग विठ्ठल” यांच्या जयघोषाने संपूर्ण कौठीचा मळा परिसर आणि शालेय वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाले.
या बालदिंडीत शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. डोक्यावर तुळशीची वृंदावने, गळ्यात तुळशीमाळ, हातात भगवी पताका आणि मुखी हरिनामाचा गजर करत बालवारकऱ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने स्वामी समर्थ मंदिरापर्यंत भक्तिमय मिरवणूक काढली. टाळ-मृदंगाच्या गजरात आणि विठ्ठल नामस्मरणात परिसर दुमदुमून गेला. विद्यार्थ्यांनी अभंग, भजन आणि हरिनामाचा अखंड गजर करत वारकरी परंपरेचा जिवंत अनुभव उपस्थितांना दिला.
या सोहळ्यात शाळेचे विद्यार्थी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व सदस्य, पालक, शिक्षक तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. बालदिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संत परंपरा, वारकरी संस्कृती, भक्ती, सामाजिक ऐक्य, शिस्त आणि संस्कार यांची जोपासना व्हावी, हा या उपक्रमामागील प्रमुख उद्देश असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
बालदिंडी स्वामी समर्थ मंदिरात पोहोचल्यानंतर विठ्ठल-रुक्मिणी व स्वामी समर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर शालेय व्यवस्थापन समिती आणि पालक यांच्या संयुक्त विद्यमाने उपस्थित सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले. अत्यंत भक्तिभावाने आणि उत्साहपूर्ण वातावरणात महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घेतला.
चिमुकल्या विद्यार्थ्यांचा उत्साह, शिस्तबद्ध सहभाग आणि त्यांच्या चेहऱ्यावरील निरागस आनंद पाहून परिसरातील ज्येष्ठ नागरिकांनी त्यांचे मनापासून कौतुक केले. या भक्तिमय वातावरणामुळे संपूर्ण गावात आषाढी एकादशीचा उत्साह द्विगुणित झाला.
बालदिंडी सोहळ्याच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थितांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, शालेय व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांचे अभिनंदन केले. भारतीय संस्कृती, संत परंपरा आणि वारकरी संप्रदायाची ओळख नव्या पिढीपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणादायी आणि संस्कारक्षम ठरला.




