, प्रतिनिधी :विकास साळुंके
पुणे ग्रामीण हद्दीतील कुरकुंभ (ता. दौंड) परिसरात अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सने मोठी धडक कारवाई करत तब्बल ३४२० किलो क्लोरल हायड्रेट (Chloral Hydrate) तसेच ५८०० लिटर रॉ केमिकल जप्त केले. ही रसायने बनावट मद्यनिर्मितीसाठी वापरली जात असल्याची माहिती समोर आली असून, या कारवाईमुळे राज्यातील बेकायदा मद्यनिर्मितीच्या मोठ्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे.

महाराष्ट्र राज्य अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सला कोल्हापूर कृती विभागामार्फत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे कुरकुंभ येथील एका फॅक्टरीवर सुमारे दीड महिना बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. त्यानंतर २९ जून २०२६ रोजी छापा टाकण्यात आला. तपासादरम्यान संबंधित कारखान्यात संशयास्पद पिवळसर-पांढऱ्या रंगाचा स्फटिकासारखा पदार्थ आणि मोठ्या प्रमाणावर रासायनिक द्रव्ये साठवून ठेवण्यात आल्याचे आढळून आले.

या कारवाईत किशोर दत्तात्रय सुर्वे (वय ५२), शैलेश विठ्ठल वाकूर (वय ५५), नवीन सरवर जुगीर सिद्दीकी (वय ४०) आणि आदेश विठ्ठल पाचांगे (वय ५८) हे संशयित आढळून आले. प्राथमिक चौकशीत हा बेकायदा कारखाना किशोर सुर्वे यांच्या मालकीचा असल्याचे निष्पन्न झाले. तसेच त्यांच्याविरुद्ध यापूर्वीही अमली पदार्थाशी संबंधित गुन्हा दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

घटनास्थळी एम.डी./मेफेड्रोनसारख्या अमली पदार्थांच्या उत्पादनासाठी वापरले जाणारे अत्याधुनिक यंत्रसामग्री, सेंट्रीफ्यूगल मशीन आणि जीएलआर (GLR) मशीन देखील जप्त करण्यात आली. जप्त केलेल्या यंत्रसामग्रीची अंदाजे किंमत सुमारे १ कोटी रुपये असल्याचे सांगण्यात आले.

जप्त करण्यात आलेल्या संशयित पदार्थाचे नमुने राज्य वैज्ञानिक प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. प्रयोगशाळेच्या अहवालानुसार तो पदार्थ क्लोरल हायड्रेट असल्याचे स्पष्ट झाले. या रसायनाचा वापर मोठ्या प्रमाणावर बनावट व विषारी दारू तयार करण्यासाठी केला जातो. पोलिसांच्या माहितीनुसार, जप्त करण्यात आलेल्या ३४२० किलो क्लोरल हायड्रेटपासून सुमारे १५ लाख लिटर विषारी दारू तयार होऊ शकली असती, असा प्राथमिक अंदाज आहे.

या प्रकरणात संबंधित इसमांची गुन्हेगारी पार्श्वभूमी, रसायनांचा पुरवठा, आर्थिक व्यवहार तसेच या बेकायदा उद्योगामागील मुख्य सूत्रधारांचा शोध घेण्याचे काम सुरू असून तपास अधिक व्यापक करण्यात आला आहे.
ही कारवाई अपर पोलीस महासंचालक (गुन्हे अन्वेषण), विशेष पोलीस महानिरीक्षक, अमली पदार्थविरोधी टास्क फोर्सचे वरिष्ठ अधिकारी तसेच कोल्हापूर कृती विभागातील पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली.




