‘पावसाची प्रतीक्षा संपली… पण आता भीमा नदीच्या रौद्ररूपाने वाढली नव्या चिंतेची सावली; पूर पाहण्याची हौस जीवावर बेतू नये’

मांडवगण फराटा (प्रतिनिधी): Rjnews 27 मराठी 

काही दिवसांपूर्वीपर्यंत आभाळाकडे आशेने डोळे लावून बसलेला शेतकरी आज त्याच पावसाच्या रौद्ररूपाकडे काळजीने पाहत आहे. पावसाअभावी करपणारी पिके, सुकणारा ऊस आणि चिंतेत सापडलेले शेतकरी यांना अखेर पावसाने दिलासा दिला; मात्र सलग मुसळधार पावसामुळे आता भीमा नदीने धोक्याची पातळी ओलांडत दुथडी भरून वाहण्यास सुरुवात केली आहे. निसर्गाने दिलेला दिलासा काही तासांतच नव्या संकटात बदलल्याचे चित्र पुणे जिल्ह्यातील अनेक भागांत पाहायला मिळत आहे

गेल्या चार-पाच दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे डोंगराळ भागातील सर्व पाणी भीमा नदीत जमा होत असून नदीच्या पाणीपातळीत सातत्याने वाढ होत आहे. परिणामी अनेक छोटे-मोठे पूल, कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आणि नदीकाठावरील मार्ग पाण्याखाली गेले आहेत. वडगाव रासाई ते नागरगाव-कुरण हा महत्त्वाचा रस्ता पाण्याखाली गेल्याने प्रशासनाने तो तात्काळ वाहतुकीसाठी बंद केला आहे. अनेक गावांचा संपर्क तात्पुरता विस्कळीत झाला असून नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत आहे.

मांडवगण फराटा परिसरातही भीमा नदीने रौद्ररूप धारण केले आहे. गावाजवळील कोल्हापूर पद्धतीचा बंधारा पूर्णपणे पाण्याखाली गेला असून पाण्याचा वेग आणि प्रवाह अत्यंत धोकादायक झाला आहे. नदीचा गडगडाट आणि वेगाने वाहणारे पाणी पाहून परिसरातील नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शेतकरी आपल्या शेताकडे काळजीने पाहत आहेत, तर नदीकाठावरील नागरिक सतत परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.

या गंभीर परिस्थितीची सर्वाधिक चिंताजनक बाब म्हणजे पूर पाहण्यासाठी होत असलेली अनावश्यक गर्दी. नदीचे रौद्ररूप पाहण्यासाठी परिसरातील तसेच आसपासच्या गावांतील नागरिक मोठ्या संख्येने नदीकाठावर येत आहेत. अनेकजण मोबाईलवर सेल्फी, व्हिडिओ आणि रील्स बनविण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. काही तरुण तर जीव धोक्यात घालून बंधाऱ्याच्या कठड्यावर उभे राहून किंवा पाण्याच्या अगदी जवळ जाऊन छायाचित्रण करत असल्याचे दृश्य पाहून जबाबदार नागरिकांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.

पूर हा मनोरंजनाचा विषय नसून जीवन-मरणाचा प्रश्न आहे, याचे भान प्रत्येकाने ठेवणे गरजेचे आहे. एका क्षणाची निष्काळजीपणा, एक चुकीचे पाऊल किंवा अचानक वाढलेला पाण्याचा वेग संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो. सोशल मीडियावर काही क्षणांची प्रसिद्धी मिळविण्याच्या मोहापायी स्वतःचा जीव धोक्यात घालणे ही अत्यंत गंभीर बाब असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आणि नागरिकांनी वारंवार आवाहन करूनही काहीजण धोकादायक ठिकाणी जात असल्याने चिंता अधिक वाढली आहे. विशेषतः पालकांनी आपल्या मुलांना नदीकाठी जाण्यापासून रोखावे, पूरग्रस्त भागात अनावश्यक वावर टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील काही तासांतही पावसाची शक्यता व्यक्त केल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. पूरग्रस्त भागात आवश्यक ती खबरदारी घेतली जात असून नदीकाठावरील नागरिकांना सावध राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच बंधाऱ्याजवळ कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था, धोक्याचे फलक, संरक्षक कठडे, सीसीटीव्ही आणि बचाव पथक तैनात करण्याची मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणला, पण त्याच पावसाने आता सुरक्षिततेची मोठी परीक्षा निर्माण केली आहे. निसर्गापुढे माणूस नेहमीच लहान असतो. त्यामुळे पूराचे सौंदर्य पाहण्यापेक्षा सुरक्षित राहणे अधिक महत्त्वाचे आहे. एक सेल्फी पुन्हा मिळू शकतो; पण गेलेला जीव कधीच परत येत नाही. म्हणूनच प्रत्येक नागरिकाने जबाबदारीने वागावे, स्वतः सुरक्षित राहावे आणि इतरांनाही सुरक्षित ठेवावे, हाच या पूरपरिस्थितीत सर्वात मोठा संदेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *