प्रतिनिधी – रामा कांबळे.
श्रीगोंदा तालुक्यातील लिपणगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या मुशाफिरी यात्रेचा सांगता समारंभ उत्साहात आणि मोठ्या उपस्थितीत पार पडला. सामाजिक न्याय, भटके-विमुक्त समाजाचे प्रश्न, नागरिकांचे हक्क आणि राजकीय सहभाग या विविध विषयांवर या कार्यक्रमात मान्यवरांनी आपली भूमिका मांडली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त तसेच महाराष्ट्र जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित लेखक, कादंबरीकार आणि भटके-विमुक्त समाजाचे नेते लक्ष्मण गायकवाड उपस्थित होते. स्वागताध्यक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी जबाबदारी सांभाळली. तसेच नगरसेविका संगीता भालेराव आणि उमाताई जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमात बोलताना सुजात आंबेडकर यांनी समाजातील वंचित घटकांना राजकीय प्रवाहात आणण्याची गरज अधोरेखित केली. त्यांनी सांगितले की, पारंपरिक राजकारणात सामान्य, गरीब आणि वंचित समाजाला संधी कमी मिळत असली तरी वंचित बहुजन आघाडीने अनेक ठिकाणी सर्वसामान्य नागरिकांना निवडणुकीत प्रतिनिधित्व मिळवून देण्याचे काम केले आहे. सत्तेमध्ये वंचित घटकांचा अधिक सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी नमूद केले.
यावेळी राज्य प्रवक्ते अरुण जाधव यांनी मुशाफिरी यात्रेचा आढावा देताना सांगितले की, ही यात्रा सुमारे साडेतीनशे किलोमीटरचा प्रवास करत ११० गावांपर्यंत पोहोचली. यात्रेदरम्यान ५६ सभा घेण्यात आल्या तसेच सुमारे ९ हजार नागरिकांशी संवाद साधण्यात आला. नागरिकांचे ओळख पुरावे, घरकुल आणि जनगणना हे यात्रेतील प्रमुख मुद्दे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष लक्ष्मण गायकवाड यांनी आपल्या भाषणात भटके-विमुक्त समाजाच्या सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, भटके-विमुक्त समाजाच्या मोठ्या लोकसंख्येच्या तुलनेत प्रतिनिधित्व अत्यल्प आहे. समाजातील ऐतिहासिक आणि सामाजिक प्रश्नांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज असून प्रस्थापित व्यवस्थेविरोधात लोकशाही मार्गाने लढा उभारण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनी यात्रेच्या सांगता समारंभात सहभाग घेतला.




