कुरकुंभजवळ सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला; 18 टन एलपीजी टँकरला लागलेली आग वेळेत विझवली
रूट पेट्रोलिंग पथकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य स्फोट टळला; महामार्गावरील शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले.
प्रतिनिधी- योगेश राऊत

पाटस : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ परिसरात नियमित रूट पेट्रोलिंग करणाऱ्या पथकाच्या सतर्कतेमुळे मंगळवारी संभाव्य भीषण दुर्घटना टळली. तब्बल १८ टन एलपीजी (LPG) गॅस वाहून नेणाऱ्या एचपी गॅसच्या टँकरला अचानक आग लागल्याचे वेळेत निदर्शनास आल्याने रूट पेट्रोलिंग अधिकाऱ्यांनी (RPO) तातडीने कारवाई करत आग आटोक्यात आणली. त्यामुळे संभाव्य स्फोट, मोठी जीवितहानी आणि कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान टळल्याने या धाडसी कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील चेनज क्रमांक ६७+९०० (LHS), कुरकुंभजवळ नियमित रूट पेट्रोलिंग सुरू असताना पुण्याहून सोलापूरच्या दिशेने निघालेला एचपी गॅसचा एमएच ०४ एफपी ५५५७ क्रमांकाचा एलपीजी टँकर जात होता. गस्तीवरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास टँकरच्या खालच्या बाजूने धूर निघत असल्याचे आले. जवळ जाऊन पाहणी केली असता टँकरच्या तळाच्या भागाला आग लागल्याचे स्पष्ट झाले.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखत रूट पेट्रोलिंग अधिकाऱ्यांनी कोणताही विलंब न करता टँकर सुरक्षित ठिकाणी थांबविला. त्यानंतर चालकाला सुरक्षिततेच्या सूचना देत प्राथमिक तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान टँकरच्या जॉइंटजवळ ऑइल किंवा ल्युब्रिकेशनच्या कमतरतेमुळे घर्षण निर्माण होऊन आग लागल्याचे निदर्शनास आले. तत्काळ उपलब्ध पाण्याचा वापर करून आग पूर्णपणे विझविण्यात आली आणि मोठा अनर्थ टळला.
या टँकरमध्ये तब्बल १८ टन एलपीजी गॅस भरलेला असल्याने परिस्थिती अत्यंत धोकादायक होती. आग वेळीच नियंत्रणात आली नसती, तर टँकरचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता आली नसती. अशा परिस्थितीत महामार्गावरील इतर वाहनचालक, प्रवासी, परिसरातील नागरिक तसेच कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रालाही मोठा धोका निर्माण झाला असता. मात्र, रूट पेट्रोलिंग पथकाच्या सतर्कतेमुळे संभाव्य दुर्घटना वेळेत टळली.
या घटनेने राष्ट्रीय महामार्गावरील नियमित गस्त, धोकादायक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांवर सातत्याने ठेवली जाणारी नजर आणि आपत्कालीन परिस्थितीत त्वरित प्रतिसाद देणाऱ्या सुरक्षा यंत्रणेचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. विशेषतः ज्वलनशील पदार्थांची वाहतूक करणाऱ्या वाहनांसाठी नियमित तपासणी आणि रूट पेट्रोलिंग किती आवश्यक आहे, याची ही घटना बोलकी साक्ष ठरली आहे.
महामार्ग सुरक्षा व्यवस्थेतील ही कामगिरी ‘गुड सेफ्टी प्रॅक्टिस’ म्हणून नोंदविण्यात येत असून, रूट पेट्रोलिंग पथकाच्या धाडस, सतर्कता आणि प्रसंगावधानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या घटनेची माहिती पुणे–सोलापूर एक्सप्रेस वेचे सेफ्टी ऑफिसर वसीम शेख यांनी दिली. तसेच महाराष्ट्र सुरक्षा बलाचे प्रभारी अधिकारी प्रल्हाद रोटे यांनीही या घटनेला दुजोरा देत रूट पेट्रोलिंगमध्ये सहभागी महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या जवानांनी दाखविलेल्या तत्परतेचे विशेष कौतुक केले




