शासनाच्या नियंत्रणामुळे खत वाटप रखडले; शेतकऱ्यांना तातडीने युरिया उपलब्ध करून देण्याची मागणी, अन्यथा आंदोलनाचा इशारा

उपसंपादक – अल्लाउद्दीन अलवी 

, ता. १३ : हंगाम २०२६ साठी शासनाच्या आदेशानुसार बाभुळसर बुद्रुक येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या गोदामात युरिया व डीएपी खतांचा संरक्षित साठा ठेवण्यात आला आहे. मात्र, या साठ्याच्या विक्री व वाहतुकीवर शासनाने निर्बंध घातल्यामुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर अडचणी निर्माण झाल्या आहेत.
शासन निर्णय क्र. कृवपदुम 280016/38/2026 नुसार, संबंधित खतसाठा हा शासनाच्या नियंत्रणाखाली ठेवण्यात आला असून जिल्हा सह-नियंत्रण समितीची लेखी परवानगीशिवाय त्याची विक्री किंवा वाहतूक करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन केल्यास अत्यावश्यक सेवा कायदा 1955 अंतर्गत संबंधित संस्थांवर कायदेशीर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.
दरम्यान, साखर कारखान्यांच्या परिपत्रकानुसार ऊस लागवड हंगाम 2026-27 साठी १ जूनपासून लागवडी करण्यात आल्या आहेत. या पिकांसाठी युरिया व डीएपी खतांची तातडीची आवश्यकता असताना साठा असूनही तो उपलब्ध होत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
याबाबत बाभुळसर बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षा मंदाकिनी अंकुश नागवडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, शासनाच्या निर्बंधांमुळे संस्था व सभासदांना खत वितरण करता येत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. तातडीने निर्णय घेऊन खत वितरणासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, जर शासनाने लवकरात लवकर सकारात्मक निर्णय घेतला नाही, तर राज्यभरात रास्ता रोको आंदोलन छेडण्याचा इशारा संस्थेच्या सभासदांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *