**”बिबट्याशी थेट झुंज; जामनेरच्या तरुणाने जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात दिला!”**

जळगाव, प्रतिनिधी : मिळालेल्या  माहितीनुसार 

ग्रामीण भागात बिबट्याच्या हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असताना जामनेर तालुक्यातील शहापूर येथे एका तरुणाने दाखवलेल्या धाडसाची सर्वत्र चर्चा रंगली आहे. शेतात हल्ला करणाऱ्या बिबट्याशी प्रत्यक्ष झुंज देत त्याला जिवंत पकडून वनविभागाच्या ताब्यात देण्याची थरारक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात आश्चर्य व्यक्त केले जात असून तरुणाच्या धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.


मुकेश नाना डोंगरे असे या धाडसी तरुणाचे नाव असून ते शहापूर गावचे रहिवासी आहेत. शहापूर-टाकरखेडा मार्गावरील त्यांच्या शेत परिसरात बिबट्या फिरत असल्याची माहिती त्यांना मिळाली होती. शेतात पाळीव जनावरे आणि शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढविला.
अचानक झालेल्या हल्ल्यामुळे काही क्षण तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. मात्र मुकेश डोंगरे यांनी धैर्य न गमावता बिबट्याचा सामना केला. जीवाची पर्वा न करता त्यांनी बिबट्याशी झुंज देत त्याला नियंत्रणात आणले. वनविभागाला माहिती देण्यात आल्यानंतर अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांनी बिबट्याला ताब्यात ठेवले. वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद केले.
या झटापटीदरम्यान मुकेश डोंगरे जखमी झाले. त्यांना तातडीने जामनेर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती समोर आल्यानंतर गावकरी, नातेवाईक तसेच परिसरातील नागरिकांनी रुग्णालयात भेट देऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या धाडसी कामगिरीची दखल राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांनी घेतली आहे. त्यांनी व्हिडिओ कॉलद्वारे मुकेश डोंगरे यांच्याशी संवाद साधून त्यांच्या धाडसाचे कौतुक केले. संकटाच्या प्रसंगी दाखविलेल्या धैर्याबद्दल त्यांनी अभिनंदन व्यक्त केले. यानंतर या घटनेची चर्चा केवळ शहापूर गावापुरती मर्यादित न राहता संपूर्ण जामनेर तालुका आणि जिल्हाभर पसरली आहे.
दरम्यान, जळगाव जिल्ह्यात बिबट्यांच्या हालचालींच्या घटना मागील काही वर्षांत वाढल्या आहेत. जंगलातील पाण्याची कमतरता, भक्ष्याचा शोध आणि मानवी वस्तीचा वाढता विस्तार यामुळे बिबटे गावांच्या हद्दीत व शेत परिसरात येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शेतकरी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे.
याच वर्षी मुक्ताईनगर येथे बसस्थानक परिसरात बिबट्या शिरल्याची घटना घडली होती. त्यावेळी वनविभागाने अनेक तासांच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला पकडले होते. तसेच रावेर तालुक्यातील एका गावात जाळ्यात अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना देखील घडली होती. या घटनांमुळे वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्षाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वनविभागाकडून अशा घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. ट्रॅप कॅमेरे, गस्ती पथके, पिंजरे आणि जनजागृती मोहिमांच्या माध्यमातून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे. वन्यप्राणी आढळल्यास स्वतः धोका पत्करण्याऐवजी तातडीने वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहनही करण्यात येत आहे.
शहापूर येथे घडलेली ही घटना मात्र धाडस, प्रसंगावधान आणि संकटसमयी दाखविलेल्या हिमतीचे उदाहरण ठरत असून मुकेश डोंगरे यांच्या शौर्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *