खोरवडी-आलेगाव परिसरात मध्यरात्री दरोडा; ७.१० लाखांचा ऐवज लंपास
प्रतिनिधी – योगेश राऊत
दौंड, ता. ११ : दौंड तालुक्यातील खोरवडी व आलेगाव परिसरातील विविध वाड्या-वस्त्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकून नागरिकांना मारहाण, दमदाटी करत तब्बल ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यास सुरुवात केली आहे.
याबाबत दौंड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संतोष मल्हारी शिंदे (वय ५०) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ३९०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ३१०(२), ३११, ११८(१) तसेच शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवार (दि. १०) रोजी रात्री १ ते पहाटे ३.१० वाजण्याच्या दरम्यान खोरवडी व आलेगाव गावांच्या हद्दीतील विविध वाड्या-वस्त्यांवर पाच ते सात अज्ञात दरोडेखोरांनी हल्ला चढविला. चाकू, कोयता, लोखंडी रॉड, लोखंडी पाईप, लाकडी काठ्या आणि दगड यांसारख्या घातक हत्यारांच्या साहाय्याने त्यांनी नागरिकांना मारहाण केली. शिवीगाळ आणि दमदाटी करत घरातील सोन्याचे दागिने, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि दुचाकी असा मौल्यवान ऐवज जबरदस्तीने चोरून नेला.
दरोडेखोरांनी अर्चना आवदे यांच्या घरातून सोन्याचे दागिने आणि १७ हजार रुपयांची रोख रक्कम, रोहित आवदे यांचा मोबाईल, शोभा खोमणे यांच्या अंगावरील दागिने, नकाबाई शिंदे यांच्या घरातील धान्याच्या पोत्यात लपवून ठेवलेले मोठ्या किमतीचे सोन्याचे दागिने, मुकिंदा चलवादी यांचा मोबाईल आणि हिरो होंडा फॅशन प्लस मोटारसायकल तसेच विनय कदम यांची होंडा युनिकॉर्न दुचाकी असा विविध ठिकाणांहून एकूण ७ लाख १० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला.
या घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. अज्ञात दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक माहिती आणि खबऱ्यांच्या माध्यमातून तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम करीत असून, गुन्हा दाखल करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक बिद्री यांनी केले आहे.




