पुणे जिल्हा नियोजन समिती बैठकीत विकासाला गती; दौंड मतदारसंघातील प्रश्नांवर राहुल कुल यांचा जोरदार पाठपुरावा

 

प्रतिनिधी – योगेश राऊत 

Sunetra Pawar यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या पुणे जिल्हा नियोजन समिती (डीपीडीसी) बैठकीत जिल्ह्याच्या सर्वांगीण विकास आराखड्यास मंजुरी देण्यात आली असून ग्रामीण व शहरी भागातील पायाभूत सुविधांना मोठी चालना मिळणार आहे. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीस जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदार, नियोजन समिती सदस्य तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. बैठकीदरम्यान Rahul Kul यांनी दौंड मतदारसंघासह पुणे जिल्ह्यातील विविध विकासकामांबाबत महत्त्वपूर्ण प्रश्न उपस्थित करत प्रशासनाचे लक्ष वेधले.
बैठकीत पुणे-सोलापूर आणि पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील मंजूर उन्नत मार्ग प्रकल्पांबाबत चर्चा झाली. फ्लायओव्हरचे काम सुरू होण्यापूर्वी संभाव्य वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा वाढीव लेन तातडीने विकसित करण्यात याव्यात, अशी ठाम मागणी राहुल कुल यांनी केली. वाढत्या वाहनसंख्येमुळे नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध करणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
ग्रामीण भागातील प्रलंबित विकासकामांनाही बैठकीत विशेष महत्त्व देण्यात आले. ग्रामपंचायत इमारती, स्मशानभूमी, अंतर्गत रस्ते, सामाजिक सभागृह यांसारखी मूलभूत कामे तातडीने पूर्ण करण्यासाठी निधी आणि प्रशासकीय मंजुरीची प्रक्रिया गतीमान करण्याची आवश्यकता राहुल कुल यांनी व्यक्त केली. ग्रामीण भागातील विकासकामे दर्जेदार आणि वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी प्रशासनाने विशेष दक्षता घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
दिव्यांग बांधवांसाठी आवश्यक साहित्य वाटप तसेच ग्रामीण भागातील खेळाडूंना क्रीडा साहित्य उपलब्ध करून देण्यासाठी ई-निविदा प्रणालीद्वारे पारदर्शक खरेदी प्रक्रिया राबविण्याचा मुद्दाही बैठकीत मांडण्यात आला. युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी ग्रामीण क्रीडा सुविधा वाढविण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
पर्यटन विकासाच्या दृष्टीने पुणे जिल्ह्याचा अद्ययावत पर्यटन आराखडा तयार करून ऐतिहासिक गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी विशेष मोहीम राबविण्याची मागणीही करण्यात आली. जिल्ह्यातील पर्यटनस्थळांवर मूलभूत सुविधा, रस्ते आणि स्वच्छतेच्या सोयी उपलब्ध झाल्यास पर्यटन व्यवसायाला चालना मिळून स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती वाढेल, असे मत बैठकीत व्यक्त करण्यात आले.
शेती आणि पाणीपुरवठा योजनांसाठी आवश्यक इलेक्ट्रिक पंप मंजूर करण्याबाबतही राहुल कुल यांनी पाठपुरावा केला. याशिवाय पर्यावरण संवर्धनासाठी जिल्हाभरात व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविण्याची सूचना त्यांनी केली. विशेषतः रिंग रोड आणि अष्टविनायक महामार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याची गरज त्यांनी अधोरेखित करत हरित विकासावर भर दिला.
ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत विकासाची गंगा पोहोचविणे आणि नागरिकांचे मूलभूत प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू राहतील, अशी भूमिका राहुल कुल यांनी बैठकीत स्पष्ट केली. पुणे जिल्ह्याच्या विकास आराखड्यास मंजुरी मिळाल्याने आगामी काळात विविध विकासकामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *