सामाजिक बांधिलकीचा आदर्श : शिक्रापूरमध्ये डुबल बंधूंनी उभारली नागरिकांसाठी मोफत पाणपोई

शिक्रापूर : प्रतिनिधी- अंकुश घारे 
वाढत्या उन्हाच्या कडाक्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी गैरसोय सहन करावी लागत असताना शिक्रापूर येथे सामाजिक बांधिलकी जपत डुबल बंधूंनी एक स्तुत्य आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला आहे. कैलासवासी संगीता अशोक डुबल यांच्या स्मरणार्थ त्यांचे चिरंजीव नितीन अशोकराव डुबल आणि सचिन अशोकराव डुबल यांनी छत्रपती संभाजी महाराज पुल तसेच विद्याधाम प्रशाला, शिक्रापूर गेट समोरील परिसरात नागरिकांसाठी मोफत पाणपोई उभारून समाजासमोर सेवाभावाचा आदर्श निर्माण केला आहे.
उन्हाळ्याच्या तीव्र झळांमध्ये रस्त्याने प्रवास करणारे प्रवासी, शालेय विद्यार्थी, कामगार, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य ग्रामस्थांना या पाणपोईचा मोठा आधार मिळत आहे. दिवसभर या परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिकांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत तहानलेल्या नागरिकांना थंड व स्वच्छ पिण्याचे पाणी सहज उपलब्ध होत असल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
विशेष म्हणजे कोणताही गाजावाजा, प्रसिद्धीचा हव्यास अथवा राजकीय हेतू न ठेवता केवळ सामाजिक जाणीव आणि सेवाभाव या भावनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. “समाजासाठी काहीतरी देण्याची भावना” जपत डुबल बंधूंनी केलेल्या या कार्याचे शिक्रापूर परिसरात सर्वत्र कौतुक होत आहे. अनेक सामाजिक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत डुबल कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव केला.
सदर पाणपोईचे उद्घाटन उत्साहात पार पडले. यावेळी शिक्रापूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच सुभाष (मामा) खैरे, ग्रामपंचायत सदस्य कृष्णाशेठ सासवडे, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मंगेश चव्हाण, सोमनाथ भापकर, नितीन मांढरे, संदीप मांढरे, अविनाश बामणे यांच्यासह परिसरातील अनेक मान्यवर, ग्रामस्थ व सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उन्हाळ्याच्या दिवसांत अशा प्रकारचे सामाजिक उपक्रम समाजाला मोठा आधार देणारे ठरत असून शिक्रापूरमध्ये उभारण्यात आलेली ही पाणपोई नागरिकांसाठी दिलासादायक ठरत आहे. डुबल बंधूंनी जपलेली सामाजिक बांधिलकी ही समाजातील इतरांसाठी प्रेरणादायी ठरत असल्याच्या भावना ग्रामस्थांकडून व्यक्त करण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *