धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी…सह्याद्री प्रतिष्ठानचे नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना निवेदन

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक उभारणीची मागणी…सह्याद्री प्रतिष्ठानचे नगराध्यक्षा ऐश्वर्या अभिजीत पाचर्णे यांना निवेदन

प्रतिनिधी:- विवेकानंद फंड 

शिरूर : धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त सह्याद्री प्रतिष्ठान शिरूर यांच्या वतीने आज दि. १४ मे २०२६ रोजी शिरूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ऐश्वर्याताई अभिजीत पाचर्णे यांना शिरूर शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य स्मारक उभारण्याबाबत निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य, धर्म आणि स्वाभिमानाच्या रक्षणासाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित करून अतुलनीय बलिदान दिले. त्यांचे शौर्य, पराक्रम, धर्मनिष्ठा आणि राष्ट्रभक्ती ही संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असून पुढील पिढ्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी, या उद्देशाने शिरूर शहरात भव्य स्मारक उभारणे अत्यंत आवश्यक आहे.

तसेच शिरूर तालुक्यातील वढू-तुळापूर या ऐतिहासिक स्थळी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे अंतिम संस्कार झाल्याने शिरूर तालुक्याला विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. मात्र, आजपर्यंत शिरूर शहरात त्यांच्या सन्मानार्थ कोणतेही भव्य स्मारक उभारण्यात आले नसल्याची खंत शिवप्रेमींनी व्यक्त केली.
धर्मासाठी आणि स्वराज्यासाठी धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांनी दिलेले बलिदान हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून ते आजही समाजासाठी चिरंतन प्रेरणास्थान असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. त्यामुळे नगरपरिषदेच्या माध्यमातून शहरातील योग्य व मध्यवर्ती जागेची पाहणी करून धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचे भव्य, प्रेरणादायी आणि सांस्कृतिक दृष्ट्या समृद्ध असे स्मारक उभारण्यासाठी तात्काळ कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली. या स्मारकामुळे शिरूर शहराच्या ऐतिहासिक वारशाला अधिक बळ मिळून पर्यटन व सांस्कृतिक विकासालाही चालना मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी निवेदन स्वीकारून या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेऊन योग्य तो पाठपुरावा करण्यात येईल, असे आश्वासन दिले. या प्रसंगी उपनगराध्यक्ष मितेश गादिया, नगरसेवक सुनील जाधव, संतोष थेऊरकर, सागर नरवडे, निलेश गाडेकर, निलेश पवार तसेच नगरसेविका रिंकू जगताप, सुनीता कुरुंदळे, स्वीटी शिंदे, सुनीता भुजबळ, आयेशा सय्यद, स्वाती साठे व संगीता मल्लाव उपस्थित होते.
तसेच सह्याद्री प्रतिष्ठानचे कृणाल काळे, सुनील इंदुलकर, सागर परभणे व विकास सांबारे यांच्यासह पदाधिकारी व शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *