घरातीलच सोन्याचे दागिने चोरणारा ४८ तासांत जेरबंद; शिरूर पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी

शिरूर : घरातीलच आईचे सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या चोरट्याला शिरूर पोलिसांनी अवघ्या ४८ तासांत अटक करत चोरीस गेलेले सुमारे नऊ तोळे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. या कारवाईमुळे शिरूर पोलिसांच्या तपास पथकाचे कौतुक होत आहे.
याबाबत शिरूर पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक २८ एप्रिल २०२६ रोजी चांडोह (ता. शिरूर) येथील दत्तात्रय बबन जाधव यांच्या बंद घरातील किचनमध्ये स्टीलच्या डब्यात ठेवलेले सुमारे नऊ तोळे वजनाचे अंदाजे ५ लाख ५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने अज्ञात व्यक्तीने चोरून नेले होते. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांनी तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक श्री. गोविंद खटींग व पथकाला तातडीने तपासाच्या सूचना दिल्या. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी रविंद्र दत्तात्रय जाधव (वय ३३, रा. चांडोह, ता. शिरूर) याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली.
पोलिसांनी आरोपीकडून चोरीस गेलेले सुमारे 5 लाख 5 हजार रुपये किमतीचे नऊ तोळे सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. गोविंद खटींग करीत आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. संदीप सिंह गिल, अपर पोलीस अधीक्षक श्री. रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. प्रशांत ढोले व पोलीस निरीक्षक श्री. संदेश केंजळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक श्री. गोविंद खटींग, पोलीस अंमलदार संदीप खेडकर, अजय पाटील तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचारी सहभागी होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *