Rjnews27marathi- रमेश बनसोडे
शिरूर प्रतिनिधी : शिरूर तालुक्यातील आंधळगाव परिसरात रविवारी पहाटे भीषण अपघात घडला असून ऊसतोड कामगारांना घेऊन जाणाऱ्या महिंद्रा पिकअप वाहनाला भरधाव कंटेनरने जोरदार धडक दिल्याने दोन जणांचा मृत्यू झाला, तर महिला व लहान मुलांसह १२ जण गंभीर व किरकोळ जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून ऊसतोड कामगारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
ही दुर्घटना १० मे २०२६ रोजी पहाटे सुमारे ५.२० वाजण्याच्या सुमारास आंधळगाव हद्दीतील सीएनजी पंपासमोर, न्हावरा ते चौफुला रोडवर घडली. महिंद्रा पिकअप (एमएच ४२ बीएफ ०६९९) या वाहनाच्या मागील हौदात ऊसतोड कामगार बसलेले असताना अशोक लेलंड कंपनीचा कंटेनर (एमएच १२ एनएक्स २९१९) भरधाव वेगाने येऊन पिकअपला धडकला.
या अपघातात संगीता सुनील मोरे (वय ३५, रा. घोडदे, ता. साक्री, जि. धुळे) व रविन सखाराम सोनवणे (वय ४५, रा. घोडदे, ता. साक्री, जि. धुळे) यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. संगीता मोरे यांचा केडगाव येथील खासगी रुग्णालयात, तर रविन सोनवणे यांचा न्हावरा ग्रामीण रुग्णालयात मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
अपघातात सीमा अभिमान मोरे, देविका सुखलाल पाडवी, मुल्या बापू माळी, साहिल मुत्या माळी (वय ५), काजल भुऱ्या माळी (वय ८), जग्री राजू पाडवी, इंदुबाई भुऱ्या माळी, सुरेखा सुनील मोरे, नरेश सुनील मोरे, सोनेबाई काळू पवार, दीपक श्यामा पाडवी आणि सुरेश श्यामा पाडवी हे जखमी झाले असून काहींवर गंभीर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी काही कामगार धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील तर काही नंदुरबार जिल्ह्यातील चौपडा तालुक्यातील असून सध्या दौंड तालुक्यातील डुबेवाडी येथे वास्तव्यास असल्याची माहिती समोर आली आहे.
फिर्यादी दादा गंगाराम पवार यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कंटेनर चालकाने हयगयीने व वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करून वाहन चालवले. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या भीषण अपघातामुळे ऊसतोड कामगारांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या असुरक्षित वाहनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. पिकअपच्या हौद्यात जीव धोक्यात घालून प्रवास करणाऱ्या कामगारांच्या सुरक्षिततेसाठी कठोर उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशनचे तपासी अधिकारी करत आहेत.




