नंदादेवी येथे विवाहितेची आत्महत्या; पतीसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
पाटस प्रतिनिधी- योगेश राऊत
दौंड तालुक्यातील नंदादेवी येथे विवाहित महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी मृत महिलेच्या पतीसह पाच जणांविरोधात दौंड पोलीस ठाण्यात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने होणारा शारीरिक व मानसिक छळ, मारहाण, शिवीगाळ आणि माहेरी जाण्यास भाग पाडल्यामुळे संबंधित महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
याबाबत दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक 293/2026 नुसार भारतीय न्याय संहिता कलम 108, 115(2), 351(2), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रविंद्र आप्पासाहेब कित्तुरे (वय 33, रा. साळमळगेवाडी, ता. जत, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची बहीण गोकुळा आप्पासाहेब कित्तुरे (लग्नानंतर गोकुळा पांडुरंग मेरगळ) हिचा विवाह 2 जुलै 2023 रोजी नंदादेवी येथील पांडुरंग बाळकृष्ण मेरगळ यांच्याशी झाला होता. पांडुरंग मेरगळ यांचे हे दुसरे लग्न असून पहिल्या पत्नीपासून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे.
लग्नानंतर काही महिन्यांतच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले होते. गोकुळा हिला तिचा पती वारंवार “तू रोगीट आहेस, मनोरुग्ण आहेस, तुझ्या औषधांचा खर्च पेलवत नाही,” असे टोमणे मारत असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच माहेरहून पैसे आणण्याची मागणी, मारहाण, शिवीगाळ आणि घराबाहेर जाण्यास सांगणे असे प्रकार सुरू असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
फिर्यादीनुसार, गोकुळा हिला गर्भधारणा होऊ नये म्हणून जबरदस्तीने गर्भनिरोधक गोळ्या देण्यात येत होत्या. गोळ्या घेण्यास नकार दिल्यास तिचा छळ केला जात होता. या प्रकारात सावत्र मुलगा प्रियवृत पांडुरंग मेरगळ, दिर रामचंद्र मेरगळ, भावजय सतीबामाई मेरगळ तसेच पांडुरंग मेरगळ यांचा मित्र आबासो आटोळे हेही सहभागी असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, संसार टिकावा म्हणून दोन्ही कुटुंबीयांनी अनेक वेळा समेट बैठका घेतल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. काही महिन्यांपूर्वी नंदादेवी येथे नातेवाईकांच्या उपस्थितीत मिटिंग घेऊन संबंधितांना समजावण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही छळ कायम राहिल्याचा आरोप आहे.
घटनेच्या आदल्या रात्री गोकुळा हिने आपल्या काकींना फोन करून पतीच्या सततच्या त्रासामुळे जगण्याची इच्छा उरली नसल्याचे सांगितल्याचे फिर्यादीत नमूद आहे. त्यानंतर 9 मे 2026 रोजी पहाटे साडेबारा ते साडेतीनच्या दरम्यान गोकुळा हिने राहत्या घरातील बेडरूममध्ये ओढणीच्या साहाय्याने फॅनला गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले.
या घटनेनंतर मृत महिलेच्या माहेरच्या नातेवाईकांनी दौंड येथे धाव घेतली. फिर्यादीच्या तक्रारीवरून पती पांडुरंग मेरगळ, प्रियवृत मेरगळ, रामचंद्र मेरगळ, सतीबामाई मेरगळ आणि आबासो आटोळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कुंभार करीत आहेत.




