“मतदार राजा जागा हो!” : २००२ मधील नाव तपासण्याचे ग्रामपंचायत शिक्रापूरचे आवाहन

मतदारांनी २००२ मधील नाव तपासून घ्यावे; ग्रामपंचायत शिक्रापूरचे आवाहन
विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) अभियानाबाबत सरपंच रमेश गडदे यांचे नागरिकांना मार्गदर्शन
शिक्रापूर, ता. शिरूर :
भारत निवडणूक आयोगामार्फत राज्यभर विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण (SIR) अभियान राबविण्यात येत असून, प्रत्येक मतदाराने २००२ च्या मतदार यादीतील आपले नाव तपासणे अत्यंत आवश्यक असल्याचे आवाहन ग्रामपंचायत शिक्रापूरचे माननीय सरपंच रमेश गडदे यांनी केले आहे. मतदारांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हे अभियान महत्त्वपूर्ण ठरणार असून नागरिकांनी यामध्ये सक्रिय सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले.
सरपंच रमेश गडदे म्हणाले की, “मतदार राजा जागा हो… आपल्या मताधिकाराचे संरक्षण करा” हा संदेश घेऊन निवडणूक आयोगाने ही मोहीम सुरू केली आहे. मतदार यादीतील अचूकता राखणे आणि प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव नोंदणीकृत राहणे ही लोकशाहीसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. त्यामुळे शिक्रापूर ग्रामपंचायत प्रशासन नागरिकांच्या मदतीसाठी सज्ज असून प्रत्येकाने वेळेत माहिती पडताळून घ्यावी.
नागरिकांनी voter.eci.gov.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊन “Search Your Name in Last SIR” या पर्यायातून आपले नाव शोधावे. नाव सापडल्यानंतर मतदार संघ क्रमांक, भाग क्रमांक तसेच यादीतील अनुक्रमांक यांची माहिती नोंद करून ठेवावी. त्यानंतर संबंधित भागातील BLO (मतदार केंद्रस्तरीय अधिकारी) यांच्याशी संपर्क साधून नावाची खात्री करून घ्यावी, असे मार्गदर्शन ग्रामपंचायतीकडून करण्यात आले आहे.
तसेच, ज्यांचे नाव २००२ च्या मतदार यादीत उपलब्ध नसल्यास त्यांनी आपल्या आई-वडील, आजी किंवा आजोबा यांच्या २००२ मधील माहितीची कागदपत्रे तात्काळ BLO कडे जमा करावीत. विशेषतः जुन्या रहिवासी नोंदी, गाव, तालुका, जिल्हा, विधानसभा मतदार संघाचे नाव, मतदार संघ क्रमांक, भाग क्रमांक व अनुक्रमांक यांची माहिती जवळ ठेवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
ग्रामपंचायत शिक्रापूर प्रशासनाने युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच नवमतदारांनी या अभियानात पुढाकार घ्यावा, असेही नमूद केले आहे. गावातील प्रत्येक पात्र मतदाराचे नाव अचूकपणे नोंदवले जावे आणि कोणताही नागरिक मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी ग्रामपंचायत स्तरावर जनजागृती मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सरपंच रमेश गडदे यांनी दिली.
शेवटी त्यांनी ग्रामस्थांना आवाहन करताना सांगितले की, “लोकशाही मजबूत करण्यासाठी प्रत्येक मतदाराची भूमिका महत्त्वाची आहे. त्यामुळे आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांची मतदार यादीतील माहिती तपासून आवश्यक दुरुस्ती तत्काळ करून घ्यावी.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *