रांजणगाव येथील मंगलमूर्ती विद्याधामचा दहावी निकाल ९६.६२ टक्केफंड मनस्वी
विद्यालयात ९४.६० टक्के गुण मिळवून प्रथम
रांजणगाव गणपती
शिरूर शिक्षण प्रसारक मंडळ, शिरूर संचलित मंगलमूर्ती विद्याधाम, रांजणगाव गणपती येथील माध्यमिक शाळेने इयत्ता दहावी (एस.एस.सी.) मार्च २०२६ परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करत ९६.६२ टक्के निकालाची भव्य कामगिरी नोंदवली आहे. विद्यार्थ्यांच्या मेहनतीला शिक्षकांच्या मार्गदर्शनाची जोड मिळाल्याने शाळेच्या यशात आणखी भर पडली असून संपूर्ण परिसरात आनंद आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
यंदा शाळेतून एकूण २३७ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले होते. त्यापैकी तब्बल २२९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून केवळ ८ विद्यार्थी अनुत्तीर्ण झाले. सातत्यपूर्ण गुणवत्तापूर्ण शिक्षण, नियोजनबद्ध अभ्यास पद्धती आणि विद्यार्थ्यांची चिकाटी यामुळे शाळेने हा उल्लेखनीय निकाल प्राप्त केला असल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले.
शाळेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी उत्कृष्ट गुण मिळवत आपली शैक्षणिक गुणवत्ता सिद्ध केली. फंड मनस्वी धनंजय हिने ४७३ गुण मिळवत ९४.६० टक्के गुणांसह प्रथम क्रमांक पटकावला. कामठे वैष्णवी भिवाजी हिने ४६० गुण मिळवत द्वितीय क्रमांक मिळविला. हराळ ऋतुजा भाऊसाहेब हिने ४५७ गुणांसह तृतीय, पडवळ गणेश राजेंद्र याने ४५६ गुणांसह चतुर्थ तर वाघ वैभवी मनोज हिने ४५५ गुण मिळवत पाचवा क्रमांक मिळविला.
विषयवार गुणवंत विद्यार्थ्यांनीही उल्लेखनीय यश संपादन केले. मराठी विषयात फंड मनस्वी धनंजय हिला ९५ गुण मिळाले. हिंदी विषयात गोविंद गौरी मुकुंद याने ९१ गुण मिळवत विशेष प्राविण्य मिळविले. इंग्रजी विषयात पडवळ गणेश राजेंद्र आणि फंड मनस्वी धनंजय यांनी प्रत्येकी ९४ गुण मिळवले. गणित विषयात पडवळ गणेश राजेंद्र याने ९७ गुण मिळवत चमकदार कामगिरी केली, तर विज्ञान विषयात फंड मनस्वी धनंजय हिने ९४ गुण मिळविले. सामाजिक शास्त्र विषयातही फंड मनस्वी धनंजय हिने ९५ गुण मिळवत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विद्यार्थ्यांच्या या घवघवीत यशाबद्दल संस्थेचे पदाधिकारी, मुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षकवृंद तसेच पालकांकडून विद्यार्थ्यांचे कौतुक करण्यात आले. शाळेतील शिस्तबद्ध वातावरण, शिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन आणि विद्यार्थ्यांची अथक मेहनत यामुळेच हा यशस्वी निकाल शक्य झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
शाळेचे मुख्याध्यापक सुनील थोरात, पर्यवेक्षक सुभाष पाचकर व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत भविष्यातही शाळेची गुणवत्तेची परंपरा कायम राहील, असा विश्वास व्यक्त केला.




