माजी सरपंच अरुण चंद्रकांत बोत्रे यांना अश्रुपूर्ण निरोप; भव्य अंत्ययात्रेत जनसागर
“गावचे न्यायालय” हरपले; गोरगरिबांना आधार देणारे, सडेतोड व न्यायप्रिय नेतृत्व कायम स्मरणात
प्रतिनिधी : विजय कांबळे
नागरगावं – पारगाव, दौंड (जि. पुणे) येथील आदर्श शिक्षक ,माजी सरपंच, ज्येष्ठ समाजसेवक व “गावचे न्यायालय” म्हणून ओळखले जाणारे अरुण चंद्रकांत बोत्रे यांना गावकऱ्यांनी अश्रुपूर्ण निरोप दिला. त्यांच्या अंत्यविधीसाठी पारगावसह दौंड व पुणे जिल्ह्यातील विविध भागांतून मोठा जनसमुदाय आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
बोत्रे सरांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा रथातून काढण्यात आली. गावातील प्रमुख मार्गांवरून निघालेल्या या अंत्ययात्रेत भजन, टाळ-मृदुंगाच्या तालावर हरिनामाचा गजर होत होता. “जय हरि विठ्ठल”च्या घोषात संपूर्ण परिसर भावुक झाला होता. ग्रामस्थ, कार्यकर्ते, माजी विद्यार्थी आणि सर्व स्तरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
माजी सरपंच म्हणून कार्य करताना बोत्रे सरांनी अनेक धाडसी व लोकहिताचे निर्णय घेत गावाच्या विकासाला नवी दिशा दिली. गोरगरिबांना आधार देत त्यांनी समाजात न्याय आणि समतेची भक्कम भूमिका निर्माण केली. गावातील वाद-विवाद शांततेने व निष्पक्षपणे सोडवण्याच्या त्यांच्या स्वभावामुळे त्यांना “गावचे न्यायालय” अशी ओळख मिळाली होती.
तुकाईदेवी ट्रस्टचे अध्यक्ष म्हणून त्यांनी धार्मिक व सामाजिक कार्यातही मोठे योगदान दिले. कोणत्याही विषयावर सडेतोड व ठाम भूमिका मांडणारे, अन्यायाविरुद्ध उभे राहणारे आणि सत्यासाठी लढणारे हे त्यांचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या निधनामुळे पारगावची मोठी व अपूरणीय हानी झाली आहे.
श्रद्धांजलीपर सभेत सर्जेराव जेधे, सयाजी आण्णा ताकवणे, पोपट भाई ताकवणे डॉ भरत खळदकर यांच्यासह सुरेश खाडे यांनी एकत्रितपणे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, “बोत्रे सर हे गावाचे आधारस्तंभ होते. तेच आमचे ‘गावचे न्यायालय’ होते. योग्य तो न्याय देणारे, सर्वांना समान वागणूक देणारे व्यक्तिमत्त्व आज हरपले आहे. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही.”
तसेच, बोत्रे सरांच्या धाडसी वृत्तीचा उल्लेख करताना एक पाय नसताना देखील यांनी सायकलवरून दिल्ली गाठून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची भेट घेतल्याची आठवणही यावेळी सांगण्यात आली.
अरुण चंद्रकांत बोत्रे यांच्या अंत्ययात्रेत उमटलेला जनसागर त्यांच्या कार्याची साक्ष देणारा ठरला. त्यांच्या जाण्याने पारगावने एक धाडसी, न्यायप्रिय, सडेतोड आणि लोकाभिमुख नेतृत्व गमावले असून, गावातील सामाजिक समतोल व मार्गदर्शनाची मोठी पोकळी निर्माण झाली आहे.




