“सरकारी दवाखान्याचे दार बंद… आणि रस्त्यावर उमटली आईची वेदना; खाजगी डॉक्टरांनी दिले जीवनदान”

शिरूर (प्रतिनिधी):अंकुश घारे 
शिरूरच्या निर्माण प्लाझा परिसरात घडलेली घटना केवळ एक प्रसंग नाही… ती एका आईच्या वेदनेचा, व्यवस्थेच्या उदासीनतेचा आणि माणुसकीच्या जिवंत उदाहरणाचा काळजाला भिडणारा आरसा आहे.
जोशीवाडी येथील एक गरीब गरोदर महिला प्रसूती कळांनी विव्हळत शिरूर ग्रामीण रुग्णालयात पोहोचली… डोळ्यांत आशा होती, पोटात वेदना… पण तिच्या म्हणण्यानुसार, “रिपोर्ट नव्हते म्हणून आम्हाला घेतलं नाही… थांबूही दिलं नाही… कोणी विचारलंसुद्धा नाही…”
हे शब्द उच्चारताना तिचा आवाज थरथरत होता… आणि त्या शब्दांत तिचं दु:ख, असहाय्यपण स्पष्ट दिसत होतं.
पण याहूनही मोठा प्रश्न उभा राहतो—
जर तिच्याकडे रिपोर्ट नव्हते, तर ते का नव्हते?
तिच्या परिसरातील आशा वर्कर, आरोग्य कर्मचारी यांनी तिची वेळोवेळी विचारपूस केली होती का?
तिच्या गर्भधारणेची नोंद, तपासणी, मार्गदर्शन — हे खरंच पार पडलं होतं का?
जर वेळेत काळजी घेतली असती…
जर आशा वर्करने तिच्या घरी जाऊन भेट घेतली असती…
तिला योग्य सल्ला दिला असता, वाहनाची व्यवस्था केली असती…
तर आज एका आईला रस्त्यावर, उघड्यावर, वेदनांनी तडफडत बाळाला जन्म द्यावा लागला असता का?
निराश झालेली ती महिला पायीच निघाली… पण निर्माण प्लाझा येथे अचानक प्रसूती कळा तीव्र झाल्या… आणि ती रस्त्यावरच कोसळली. तिचा आक्रोश ऐकून परिसरातील महिलांनी धाव घेतली… कोणीतरी स्कार्फ दिला, कोणीतरी साड्या आणल्या… त्या साड्यांच्या आडोशात, रस्त्यावरच एका निष्पाप जीवाचा जन्म झाला.
तो क्षण हृदय पिळवटून टाकणारा होता… आई वेदनांनी विव्हळलेली… बाळ निश्चल… आणि आजूबाजूला उभे असलेले लोक असहाय्य…
याच वेळी माणुसकीचा खरा चेहरा पुढे आला.
घटनेची माहिती मिळताच डॉ. सुनिता पोटे कोणताही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाल्या. कागदपत्रं, औपचारिकता, अडथळे — काहीही न पाहता त्यांनी तत्काळ उपचार सुरू केले.
बाळ जन्मल्यानंतर काही क्षण शांत होतं… श्वास नव्हता…
क्षणभर सगळ्यांच्या हृदयाचा ठोका चुकला…
पण डॉ. पोटे यांच्या प्रयत्नांनी बाळाने पहिला रडण्याचा आवाज काढला…
आणि त्या आवाजासोबतच वातावरणात आनंदाश्रूंचा पूर आला…
टाळ्यांचा कडकडाट झाला… आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिलासा उमटला…
“निर्माण प्लाझावर झाला निर्माण…”
असं म्हणत नागरिकांनी त्या नवजात जीवाचं स्वागत केलं.
यानंतर आई आणि बाळाला तातडीने मिरा नर्सिंग होम येथे हलवण्यात आलं, जिथे दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.

एक वेदनादायी सत्य…
या घटनेत माणुसकी जिंकली… पण व्यवस्था हरली.
सरकारी दवाखान्याचे दार बंद झाले…
पण खाजगी डॉक्टरांनी आपले हात पुढे करून एका आई-बाळाला जीवनदान दिले.
ही घटना फक्त एक बातमी नाही…
ही एका आईच्या वेदनेची कहाणी आहे…
आणि व्यवस्थेला जागं करणारा एक जळजळीत प्रश्न आहे—
“आशा” नावाची व्यवस्था खरंच जिवंत आहे का…?

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *