शिरूर तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मुलींचे वर्चस्व; २१ पैकी १७ पुरस्कारांवर मुलींची मोहो


शिरूर तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेत मुलींचे वर्चस्व; २१ पैकी १७ पुरस्कारांवर मुलींची मोहोर
रांजणगाव गणपती :
शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये सुंदर लेखनाची आवड जोपासण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय सुंदर हस्ताक्षर स्पर्धेमध्ये यंदा मुलींनी जबरदस्त कामगिरी करत बाजी मारली आहे. अंतिम विजेत्या ठरलेल्या २१ विद्यार्थ्यांपैकी तब्बल १७ पुरस्कार मुलींनी पटकावत आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. या उल्लेखनीय यशामुळे शिरूर तालुक्यातील मुलींचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था, पुणे शाखा शिरूर यांच्या वतीने जागतिक मराठी भाषा दिनाच्या निमित्ताने ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. तालुक्यातील जिल्हा परिषद तसेच नगरपालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शाळा पातळीवरून निवड झालेल्या २८६ विद्यार्थ्यांमधून तज्ञ परीक्षकांनी सर्वोत्कृष्ट सुंदर हस्ताक्षर असलेल्या २१ विद्यार्थ्यांची अंतिम निवड केली.
या अंतिम विजेत्यांमध्ये १७ मुली आणि ४ मुलांचा समावेश असून मुलींनी आपल्या सुबक व आकर्षक लेखनकलेच्या जोरावर बहुसंख्य पुरस्कार पटकावले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही सुंदर हस्ताक्षराची जाणीव आणि लेखनकलेबद्दलची आवड कायम असल्याचे या स्पर्धेतून स्पष्ट झाले.
संस्थेचे अध्यक्ष राहुल चातुर, मुख्य कार्यवाह विवेकानंद फंड तसेच शाखा संस्थापक मनोहर परदेशी यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषेची गोडी वाढावी तसेच हस्ताक्षर सुधारण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने दरवर्षी ही स्पर्धा आयोजित केली जाते. यंदाही विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवला.
विजेत्या स्पर्धकांची नावे पुढीलप्रमाणे :
मुली : शिवन्या प्रमोद जठार, मानसी मारोती तेलंगे, उत्कर्षा भाऊसो गायकवाड, अधिरा कुलदीप शेळके, पूर्वा रवींद्र पावसे, तेजस्विनी संभाजी चिकटे, आरोही विक्रम गांधले, समीक्षा नवनाथ गायकवाड, गार्गी महेंद्र नागवडे, आरोही विशाल कुदळे, तेजस्विनी भूषण शितोळे, कीर्ती सचिन झावरे, श्रेया देविदास मैंद, स्वरूपा महेंद्र शेळके, आदिती राहुल झगडे, गौरी विष्णू गायकवाड, ईश्वरी गोरक्षनाथ धुमाळ.
मुले : अभय विजय राठोड, पार्थ सुहास निकम, शौर्य गणेश कळसकर, स्वराज नितीन गरुड.
शालेय गुणवत्तेमध्ये राज्यात प्रथम क्रमांकावर असलेल्या शिरूर तालुक्यातील विद्यार्थ्यांनी पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप पाडली आहे. या यशाबद्दल तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी डॉ. प्रीतम कोकणे यांनी सर्व विजेत्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *