ITC मिशन सुनहरा कल व बंधन संस्थेच्या पुढाकारातून शिरूर तालुक्यातील ६०० महिलांची उद्योजकतेकडे झेप
शिरूरच्या महिलांची ‘गरुड झेप’; ४१ गावांतील ६०० महिला बनल्या उद्योजक
विजय कांबळे – प्रतिनिधी
नागरगाव : पुणे जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी राबविण्यात आलेल्या उपक्रमातून शिरूर तालुक्यातील महिलांनी उद्योजकतेकडे भक्कम पाऊल टाकत आदर्श निर्माण केला आहे. ITC मिशन सुनहरा कल आणि बंधन सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त पुढाकारातून तालुक्यातील ४१ गावांमधील तब्बल ६०० महिलांना विविध लघुउद्योगांच्या माध्यमातून स्वावलंबी बनविण्यात आले आहे. या उपक्रमामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला नवे बळ मिळाले असून हा प्रयोग राज्यासाठी प्रेरणादायी ठरत आहे.
या उपक्रमाअंतर्गत महिलांना शिलाई मशीन, किराणा किट, चप्पल-बुटांचे साहित्य, हातगाडी तसेच भाजीपाला, फळ विक्री, सुकट-बोंबील व मासे विक्री, कपड्यांचा व्यवसाय, कुक्कुटपालन, अंडी विक्री आदी विविध व्यवसायांसाठी आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अनेक महिलांनी स्वतःचा व्यवसाय उभारून कुटुंबाच्या उत्पन्नात हातभार लावण्यास सुरुवात केली आहे. आर्थिक स्वावलंबनासोबतच समाजात स्वतःची ओळख निर्माण करण्याची संधी या महिलांना मिळत आहे.
या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांना मार्गदर्शन करताना पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी ग्रामीण महिलांनी आत्मविश्वासाने पुढे येऊन उद्योजकतेच्या माध्यमातून स्वतःचे जीवनमान उंचावावे, असे आवाहन केले. महिलांचे सक्षमीकरण ही समाजाच्या सर्वांगीण प्रगतीची गुरुकिल्ली असल्याचे त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाला जिल्हा परिषद पुणे अध्यक्ष विरधवल जगदाळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, सचिन पालमवार (जनरल मॅनेजर, ICML), निशांत कुमार (जनरल मॅनेजर), शालिनी कडू (प्रोजेक्ट डायरेक्टर, DRDA), महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद खंडागळे, मुनेश सक्सेना (सीनियर प्रोग्राम मॅनेजर, ITC) यांच्यासह बंधन सेवाभावी संस्थेचे एरिया मॅनेजर योगेंद्र कुमार, बिदूत बाघ, शेरअली खान, महादेव गायकवाड, विशाल ओव्हाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रजत मंडल, परितोष दास, अमल मंडल, मारुती डोंगरे, इरफान पटेल, जयराम कांबळे आणि मनोज थोरात यांनी विशेष परिश्रम घेतले.
ग्रामीण महिलांना आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग दाखवणारा हा उपक्रम भविष्यात अधिक महिलांना प्रेरणा देणारा ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




