दौंड : प्रतिनिधी – विकास साळुंके
कुसेगाव परिसरात सामाजिक बांधिलकी जपत जनहित फाउंडेशनच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रम सातत्याने राबविले जात आहेत. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वन्यप्राणी आणि भटक्या जनावरांना पाण्याची टंचाई भासू नये या उद्देशाने फाउंडेशनतर्फे “पुण्य कर्म अभियान” हाती घेण्यात आले असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
गावालगत असलेल्या वन विभागाच्या परिसरातील पाणवठ्यांमध्ये पाणी उपलब्ध व्हावे यासाठी या मोहिमेअंतर्गत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. या उपक्रमाचा एक भाग म्हणून वन विभागातील पाणवठ्यात दुसरा पाणी टँकर सोडण्यात आला. दौंड मार्केट कमिटीचे माजी सभापती सागर पाटील यांच्या सौजन्याने हा टँकर उपलब्ध करून देण्यात आला. तसेच गावठाण परिसरात फिरस्ती मुके जनावरे व पक्ष्यांसाठीही ठिकठिकाणी लहान पाणवठे तयार करून पाण्याची सोय करण्यात आली आहे.
श्री स्वामी समर्थ मंदिर, पाटस येथील अध्यात्मिक मार्गदर्शक तात्या महाराज ढमाले यांच्या आशीर्वादाने सुरू झालेल्या या अभियानाचा शुभारंभ दौंड पंचायत समितीचे गटनेते व सदस्य शिवाजी ढमाले, जय शिवसंग्राम पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष वसंत साळुंखे आणि माजी सभापती सागर पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बांगर, भाऊ सोनवणे, सुरज शितोळे, विकास शितोळे, गणेश मोरे, पोलीस पाटील गणेश शितोळे, अजय कोकाटे, किशोर शितोळे, गोरख कोळेकर, धनंजय निंबाळकर, बाळू सोनवणे तसेच वन विभागाचे कर्मचारी बापू शितोळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस जनहित फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष मनोज फडतरे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी बोलताना त्यांनी उन्हाळ्याच्या दिवसांत वन्यप्राणी आणि पक्ष्यांना पाण्याची मोठी गरज भासते, त्यामुळे पंचक्रोशीतील सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी पुढाकार घेऊन पाण्याची व्यवस्था करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
या उपक्रमामुळे परिसरातील वन्यप्राणी, भटकी जनावरे आणि पक्ष्यांना मोठा दिलासा मिळणार असून सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या अभियानाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.




