अरणगाव हद्दीत अवैध मुरुम उत्खनन – महसूल विभागाची निष्क्रीयता; ग्रामस्थांचा संताप

प्रतिनिधी : शिक्रापूर
शिरूर तालुक्यातील अरणगाव गावठाण हद्दीत शासनाची परवानगी न घेता मोठ्या प्रमाणावर मुरुम उत्खनन झाल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे. गावातीलच काहींनी संगनमत करून जेसीबी (एम. एच. 42 बी जे 9746) व ट्रॅक्टरच्या सहाय्याने उत्खनन केले. त्यानंतर हा मुरुम रस्त्यावर टाकण्यात आल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी राजेंद्र बापूराव टेमगिरे यांनी तहसीलदार शिरूर यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

खासगी रस्त्यासाठी मुरुमाचा वापर?
तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, अरणगाव–आलेगाव पागा जुन्या रस्त्याच्या दक्षिणेकडील सर्व्हे नंबरचा बांध सपाट करून गट नं. 95 पर्यंत मुरुम टाकण्यात आला. मात्र हा मुरुम गावातीलच एका खासगी रस्त्यासाठी वापरला गेला असल्याचा संशय व्यक्त होत आहे. शासनाची कुठलीही परवानगी न घेता झालेले हे उत्खनन महसूल विभागासाठी मोठे आव्हान ठरू शकते

तक्रार असूनही कारवाईचा अभाव
तक्रारदार राजेंद्र टेमगिरे यांनी जेसीबी मालक व संबंधितांवर दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी केली आहे. मात्र घटनेला तब्बल ३५ दिवस उलटून गेले तरी महसूल विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांचा संताप उफाळून आला असून, महसूल विभागाच्या निष्क्रीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अधिकारी मौन का धरतात?
या प्रकरणी मंडळ अधिकारी व महसूल अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न झाला. मात्र कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अधिकाऱ्यांचे मौन ग्रामस्थांच्या शंका अधिकच गडद करत आहे.
ग्रामस्थांचा थेट सवाल
गावकऱ्यांनी प्रशासनालाच थेट सवाल केला आहे –
महसूल विभाग दोषींना पाठीशी घालत आहे का?
शासनाचा महसूल बुडवूनही दोषींवर कारवाई का होत नाही?
चोराला सोडून तक्रारदारालाच छळले जाणार का?

या प्रश्नांना अद्याप कोणतेही स्पष्ट उत्तर न मिळाल्याने गावात संभ्रम आणि रोषाचे वातावरण आहे.
प्रशासनाची कसोटी
अरणगाव गावातील परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत असून, महसूल विभागाने ठोस कारवाई करावी, अशी ग्रामस्थांची मागणी आहे. आता प्रशासन दोषींवर खरंच कारवाई करते की केवळ डावलण्याची भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.




