शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा – वडगाव रासाई रस्ता खड्डेमय : नागरिक त्रस्त, शासनाचे दुर्लक्ष!
शिरूर तालुका |
शिरूर तालुक्यातील आंधळगाव फाटा ते वडगाव रासाई या मुख्य रस्त्याची दयनीय अवस्था झाली असून संपूर्ण रस्ता अक्षरशः उखडून खड्डेमय झाला आहे. या रस्त्यावरील परिस्थिती इतकी गंभीर आहे की, लहान वाहनांपासून ते जड वाहनांपर्यंत सर्वच वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. जागोजागी खोल खड्डे पडल्यामुळे अपघाताची शक्यता वाढली आहे. अनेकदा दुचाकीस्वारांचा तोल जाऊन अपघात घडताना दिसतो, तर चारचाकी वाहनांचे टायर फाटणे, पंचर होणे, शॉक अब्झॉर्बर आणि इतर भागांचे नुकसान होणे ही रोजचीच बाब झाली आहे.

स्थानिक नागरिक सांगतात की, हा रस्ता व्यवस्थित दुरुस्त असेल तर गावागावांतून जाणाऱ्या सामान्य लोकांना, शेतकऱ्यांना आणि विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळेल. सध्या मात्र दैनंदिन प्रवास ‘साहस’ ठरत असून, प्रवाशांचा जीव धोक्यात टाकणारी परिस्थिती निर्माण झाली आहे.
यामध्ये कुरुळी येथील बेडकीच्या पुलाजवळील रस्ता सर्वाधिक खराब झाला असून पावसाळ्यात या भागात प्रवास करणे म्हणजे नागरिकांसाठी जीव धोक्यात घालण्यासारखे आहे. लहान मुले, शालेय बस, रुग्णवाहिका यांनाही प्रचंड अडचणींचा सामना करावा लागत आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून रस्ता दुरुस्तीची मागणी होत असूनही संबंधित विभाग, ग्रामपंचायत व सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नागरिक करत आहेत. “दरवर्षी लाखो रुपयांचा निधी खर्च होतो, तरीही रस्ते टिकाव धरत नाहीत. दुरुस्ती केल्याचे दाखवले जाते पण काही दिवसांतच रस्ता पुन्हा खड्डेमय होतो. यामागे ठेकेदार व अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाला जबाबदार धरणे भाग आहे,” अशी बोचरी टीका नागरिकांनी केली.
स्थानिक लोकप्रतिनिधींनी, विशेषतः तालुक्याच्या आमदारांनी आणि संबंधित खात्यांनी तातडीने लक्ष घालून रस्त्याची दर्जेदार दुरुस्ती करून घ्यावी, अशी सर्वसामान्य पातळीवरून मागणी जोर धरत आहे. अन्यथा रस्ता बंद आंदोलनासह तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.




