कळस, पारनेर परिसरातील बिबट्यांचा वाढता वावर – शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात.

कळस, पारनेर परिसरातील बिबट्यांचा वाढता वावर – शेतकऱ्यांचे जीवन धोक्यात.

कळस येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू

शिरूर प्रतिनिधी

पारनेर तालुक्यातील कळस येथे मंगळवारी (दि. २ सप्टेंबर) रात्री साडेसात वाजण्याच्या सुमारास घडलेल्या बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी गणेश तुळशीराम गाडगे (वय ४०) यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले आहे.

गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर कळस-सुतार वस्ती रस्त्यालगत हा प्रकार घडला. गाडगे हे शेतावरून घरी परतत असताना अचानक बिबट्याने झडप घालून हल्ला केला. रात्री आठ वाजेपर्यंत ते घरी न पोहोचल्याने कुटुंबीयांनी शोध घेतला असता हा प्रकार उघडकीस आला. ग्रामस्थांच्या मदतीने त्यांना तातडीने पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

कळस परिसर डोंगराळ असून उसाच्या शेतीमुळे येथे बिबट्यांचा वावर कायम असतो. यापूर्वी जनावरांवर हल्ल्याच्या घटना घडल्या होत्या, मात्र मानवावरचा हा पहिलाच प्राणघातक हल्ला आहे. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड भीती पसरली आहे. गाडगे यांच्या निधनाने गाव व परिसर शोकाकुल झाला आहे.

घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी तातडीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत, अशी मागणी केली. वनविभागाने या घटनेची गंभीर दखल घेत दोन पिंजरे लावले असून संबंधित भागात तपास सुरू आहे.

दरम्यान, सरकारच्या नियमानुसार मृतकाच्या कुटुंबीयांना १० लाख रुपये रोख व १५ लाख रुपयांच्या ठेव पावतीच्या स्वरूपात मदत दिली जाणार असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले.

कळस गावाच्या तीनही बाजूंना डोंगराळ भाग असून, उसाच्या पिकामुळे बिबट्यांना सुरक्षित अधिवास मिळतो. सध्या या परिसरात आठ-दहा बिबट्यांचा वावर असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. त्यामुळे एकाला पकडले तरी इतर बिबटे वारंवार गावात शिरतात. या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी सतर्क राहावे, असे आवाहन वनविभागाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *