चिंचणी परिसरात कांदा लागवडीला वेग; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रब्बी पिकांसाठी पाणी राखण्याची शेतकऱ्यांची मागणी

चिंचणी परिसरात कांदा लागवडीला वेग; पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर रब्बी पिकांसाठी पाणी राखण्याची शेतकऱ्यांची मागणी

 

नागरगाव : प्रतिनिधी विजय कांबळे

 

यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्याने धरणांमधील पाणीसाठ्यावर मोठा परिणाम झाला असून, आगामी उन्हाळ्यातील पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेऊन चिंचणी परिसरातील शेतकऱ्यांनी कांदा लागवडीला लवकर सुरुवात केली आहे. घोड धरण जलाशय परिसरातील उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करत गावरान कांद्याची लागवड करण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे.

 

पावसाअभावी अनेक भागांत कांदा रोपांची उपलब्धता आणि लागवडीसाठी आवश्यक ओलावा निर्माण झालेला नाही. त्यामुळे काही शेतकरी बाहेरील भागातून कांदा रोपे खरेदी करून चिंचणी परिसरात आणत आहेत. यंदा दिवाळीच्या कालावधीत लागवड केलेला कांदा तुलनेने लवकर काढणीस येण्याची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांनी हंगामाचे नियोजन केले आहे.

 

घोड धरण जलाशय परिसरातील शेतकऱ्यांनी कांद्यासोबतच जनावरांसाठी चारा, वैरण तसेच ऊस आणि अन्य रब्बी पिकांची लागवड केली आहे. मात्र उपलब्ध पाणीसाठा अत्यल्प असल्याने पुढील काळात पाणी कपात झाल्यास या पिकांवर त्याचा थेट परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून सिंचनासाठी उपलब्ध पाणी शक्य तितक्या काळ टिकवून ठेवण्याची मागणी होत आहे.

 

“उपलब्ध पाणीसाठा फेब्रुवारी-मार्चपर्यंत टिकला तर सध्या शेतात उभी असलेली पिके शेतकऱ्यांच्या पदरात पडण्यास मदत होईल. तसेच जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही काही प्रमाणात मार्गी लागेल,” अशी भूमिका उपसरपंच अनिल पवार यांनी व्यक्त केली.

 

दरम्यान, घोड धरण तसेच उजनी धरणाच्या संबंधित लाभक्षेत्रातील गावांमध्ये सध्या चारा, वैरण, ऊस आणि रब्बी हंगामातील विविध पिके उभी आहेत. त्यामुळे रब्बी हंगाम पूर्ण होईपर्यंत सिंचनाचे पाणी अचानक बंद करू नये, तसेच कृषी पंपांसाठी होणारी वीज कपात टाळावी, अशी मागणी चिंचणी परिसरातील शेतकरी वर्गातून केली जात आहे.

 

कमी पावसामुळे यंदाचा रब्बी हंगाम आधीच आव्हानात्मक बनला आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध जलसाठ्याचे योग्य नियोजन करून पिण्याच्या पाण्यासोबतच उभी पिके आणि जनावरांच्या चाऱ्याला आवश्यक पाणी मिळावे, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून व्यक्त होत आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *