मध्यरात्री घरात घुसलेल्या चोरट्यांचा वृद्ध दाम्पत्यावर हल्ला; ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू, पती गंभीर

मध्यरात्री घरात घुसलेल्या चोरट्यांचा वृद्ध दाम्पत्यावर हल्ला; ७२ वर्षीय महिलेचा मृत्यू, पती गंभीर

 

सांगवी दुमाला येथील धक्कादायक घटना; घरफोडी की घातपात? पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत

 

 – श्रीगोंदा | प्रतिनिधी- राम कांबळे

श्रीगोंदा तालुक्यातील सांगवी दुमाला परिसरात मध्यरात्री घरात घुसलेल्या अज्ञात व्यक्तींनी वृद्ध दाम्पत्यावर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात मंगल शिवाजी भोईटे (वय ७२) यांचा मृत्यू झाला असून त्यांचे पती शिवाजी परसराम भोईटे (वय ७६) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.

 

 

या घटनेमुळे सांगवी दुमाला परिसरात खळबळ उडाली असून वृद्ध दाम्पत्याच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

 

मिळालेल्या माहितीनुसार, नगर-दौंड महामार्गालगत सांगवी दुमाला हद्दीत, मंगल कार्यालयाच्या मागील बाजूस भोईटे कुटुंबीयांचे दोन मजली घर आहे. कुटुंबातील इतर सदस्य घराच्या वरच्या मजल्यावर झोपले होते, तर शिवाजी भोईटे व मंगलाबाई भोईटे हे एका मजल्यावर राहत होते.

 

रात्री जेवण झाल्यानंतर कुटुंबातील सर्वजण झोपी गेले. मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात व्यक्तींनी घराचा दरवाजा तोडून आत प्रवेश केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घरातील कपाटांची उचकापाचक सुरू असताना आवाजाने शिवाजी व मंगलाबाई जागे झाले. त्यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता हल्लेखोरांनी त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे समोर आले आहे.

 

या हल्ल्यात मंगलाबाई यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर शिवाजी भोईटे गंभीर जखमी झाले.

 

सकाळपर्यंत कुटुंबीयांना घटनेची कल्पनाच नव्हती

 

घटनेनंतर घरातील इतर सदस्यांना याची तत्काळ माहिती मिळाली नाही. दुसऱ्या दिवशी दुपारच्या सुमारास आई-वडील घराबाहेर का आले नाहीत, याची चिंता वाटल्याने कुटुंबीयांनी दरवाजा ठोठावला. आतून दरवाजा बंद असल्याने संशय वाढला.

 

नातेवाईक व शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा उघडल्यानंतर घरातील दृश्य पाहून कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. शिवाजी भोईटे हे गंभीर जखमी अवस्थेत फरशीवर पडले होते, तर घरातील बेडरूममध्ये मंगलाबाई गंभीर जखमी अवस्थेत आढळल्या. दोघांनाही मोठ्या प्रमाणात दुखापत झाल्याचे दिसून आले.

 

जखमी शिवाजी भोईटे यांना तातडीने दौंड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, मंगलाबाई यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.

 

पाच ते सहा जण घरात शिरल्याचे जखमी पतीचे म्हणणे

 

प्राथमिक माहितीनुसार, रात्री पाच ते सहा जण चोरीच्या उद्देशाने घरात शिरल्याचे जखमी शिवाजी भोईटे यांनी सांगितल्याची माहिती आहे. हल्लेखोरांनी दोघांनाही मारहाण केल्याचेही त्यांनी सांगितले आहे. घरातील सामानाची पाहणी केली असता सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब असल्याचे कुटुंबीयांच्या निदर्शनास आले आहे. मात्र, चोरीस गेलेल्या ऐवजाची नेमकी किंमत अद्याप स्पष्ट झालेली नाही.

 

पोलिसांचा तपास वेगाने सुरू

 

घटनेची माहिती मिळताच श्रीगोंदा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून ठसे तज्ज्ञ तसेच श्वानपथकाला पाचारण करण्यात आले. घटनास्थळावरून विविध पुरावे व माहिती संकलित करण्याचे काम सुरू आहे.

 

ही घटना नेमकी घरफोडी व चोरीच्या उद्देशाने झाली आहे की यामागे अन्य काही कारण आहे, यासह विविध शक्यतांचा पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे.

 

श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुभाष सानप यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाचे चक्र वेगाने फिरवण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडूनही तपासावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

 

अंत्यसंस्कार शोकाकुल वातावरणात

 

मंगलाबाई भोईटे यांचा मृतदेह श्रीगोंदा ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी दाखल करण्यात आला. शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

वयाच्या उत्तरार्धात शांतपणे आयुष्य जगणाऱ्या वृद्ध दाम्पत्यावर मध्यरात्री झालेल्या या हल्ल्याने परिसर हादरला आहे. एका बाजूला पत्नीचा मृत्यू आणि दुसऱ्या बाजूला गंभीर जखमी पती रुग्णालयात जीवन-मरणाच्या संघर्षात असल्याने भोईटे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

 

दरम्यान, या घटनेमागील नेमके कारण, हल्लेखोरांची संख्या, चोरीस गेलेला ऐवज आणि आरोपी कोण आहेत, याचा तपास श्रीगोंदा पोलिसांकडून सुरू असून तपास पूर्ण झाल्यानंतरच घटनेचे संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *