बाजरी मळणीतील भुसावरून वाद विकोपाला; मारामारीत दोघे जखमी, एकाची बरगडी फ्रॅक्चर.
Rjnews 27 मराठी – शिरूर
गोलेगाव : बाजरी मळणी मशीनचा भुसा शेतात आल्याच्या कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर मारामारीत झाल्याची घटना गोलेगाव येथील पडवळ मळा परिसरात ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी घडली. या घटनेत दोघे जखमी झाले असून, एका व्यक्तीच्या बरगडीला फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ३० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास गोलेगाव, पडवळ मळा येथील घराच्या पाठीमागील रस्त्यावर ही घटना घडली. बाजरी मळणी मशीनचा भुसा आरोपीच्या शेतात आल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला.
यावेळी बाबुराव ज्ञानदेव पडवळ यांनी फिर्यादी चंद्रकांत ज्ञानदेव पडवळ यांच्या मुलगा रविराज चंद्रकांत पडवळ याला लाकडी दांडक्याने मारहाण करून जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. तसेच चंद्रकांत पडवळ यांच्या पत्नी मंगल चंद्रकांत पडवळ आणि सून कोमल रविराज पडवळ यांनाही हाताने मारहाण केल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, चंद्रकांत पडवळ यांच्या डाव्या बाजूच्या बरगडीजवळ दगडाने मारहाण झाल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली असून, त्यांच्या बरगडीला फ्रॅक्चर झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेत रविराज पडवळ आणि चंद्रकांत पडवळ हे जखमी झाले आहेत. तसेच घटनेदरम्यान शिवीगाळ व दमदाटी केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी चंद्रकांत ज्ञानदेव पडवळ, वय ६१ वर्षे, व्यवसाय शेती, रा. गोलेगाव (पडवळ मळा), ता. शिरूर, जि. पुणे यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार बाबुराव ज्ञानदेव पडवळ, वय ६५ वर्षे, रा. गोलेगाव, ता. शिरूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार मोरे, ब.नं. १५७२ करीत आहेत. गुन्हा दाखल अमलदार म्हणून पोलीस हवालदार खबाले, ब.नं. २३४२ यांनी काम पाहिले आहे.
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे
जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560







