संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी 

बाभुळसर बुद्रुक : सर्वसामान्य सभासदांच्या हिताला प्राधान्य देत सेवा देण्याची परंपरा जपणाऱ्या बाभुळसर बुद्रुक येथील संत तुकाराम विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेची ३२ वी वार्षिक सर्वसाधारण सभा सोमवार, दि. २८ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी १० वाजता संस्थेच्या सभागृहात चेअरमन सचिन बापू मचाले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली.

संस्थेचे संस्थापक चेअरमन कै. तुकाराम विठोबा नागवडे यांनी सर्वसामान्य सभासदांना न्याय मिळावा आणि संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना सहकाराच्या माध्यमातून सेवा उपलब्ध व्हावी, या उद्देशाने संस्थेच्या उभारणीत महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांची हीच सेवा परंपरा पुढे नेण्याचा प्रयत्न संस्थेच्या माध्यमातून सुरू असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

सभेच्या प्रारंभी संस्थेचे सचिव विजय सोपान नागवडे यांनी मागील वार्षिक सर्वसाधारण सभेचे इतिवृत्त तसेच सभेतील विविध विषयांचा तपशील सभासदांसमोर वाचून दाखविला. त्यानंतर संबंधित विषयांवर सभासदांनी हात वर करून मंजुरी दर्शविली. सभेतील सर्व विषयांना सभासदांनी एकमताने मंजुरी दिली.

यावेळी चेअरमन सचिन बापू मचाले यांनी संस्थेच्या आर्थिक व्यवहाराची माहिती सभासदांना दिली. संस्थेची एकूण सभासद संख्या ३३० असून, वसूल भागभांडवल ३६ लाख २३ हजार ३९५ रुपये आहे. निधीची गुंतवणूक १६ लाख १५ हजार ५१८ रुपये असून, बँक कर्जाची रक्कम ३ कोटी १७ लाख २ हजार १७४ रुपये आहे. तसेच सभासदांना दिलेले कर्ज ३ कोटी २६ लाख ८४ हजार ८९२ रुपये असून, इतर गुंतवणूक २१ लाख १ हजार ९५० रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.

यावेळी मनोगत व्यक्त करताना शिरूर तालुका खरेदी-विक्री संघाचे उपाध्यक्ष बाळासाहेब (नाना) नागवडे यांनी संस्थेच्या कामकाजाबाबत माहिती देताना सांगितले की, संस्थेच्या थकबाकी वसुलीला प्राधान्य देण्यात आले असून शासनाच्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांनाही त्याचा लाभ मिळाला आहे. संस्थेने पात्र सभासदांना वेळेत कर्जवाटप करण्याचे काम केले असून, सभासदांनीही मध्यम मुदतीच्या कर्जाची वसुली करण्यास सहकार्य केले आहे.

उर्वरित सभासदांनीही थकीत कर्जाची रक्कम वेळेत भरून संस्थेला सहकार्य केल्यास आगामी आर्थिक वर्षात संस्थेला चांगला नफा मिळू शकतो. त्यातून सभासदांना लाभांश (डिव्हिडंड) देता यावा, यासाठी संस्थेचे पदाधिकारी व संचालक मंडळ प्रयत्नशील राहतील, अशी ग्वाही नागवडे यांनी दिली.

दरम्यान, पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक २०२६-२०३० निवडणुकीसाठी गणेश फत्तेसिंग नागवडे यांना सभासदांनी एकमताने ठराव दिल्याने त्यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. तसेच केडर सचिव सौरभ विजय नागवडे यांची कुरुळी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या सचिवपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.

सभेच्या शेवटी मा. चेअरमन मनोहर मचाले यांनी उपस्थित सभासद, पदाधिकारी व मान्यवरांचे आभार मानले. संस्थेच्या पुढील वाटचालीसाठी सभासदांनी सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *