DJ ला फाटा; टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन

DJ ला फाटा; टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन

Rjnews27 मराठी – विजय कांबळे 

वडगाव रासाईतील हनुमान गणेश मंडळाचा अनुकरणीय उपक्रम; शिरूर पोलिसांकडून कौतुक

 

वडगाव रासाई, ता. शिरूर : गणेशोत्सव म्हटला की मोठ्या आवाजातील DJ, ध्वनिक्षेपक आणि जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळते. मात्र, आधुनिकतेच्या या प्रवाहाला फाटा देत वडगाव रासाई व परभणेवाडी परिसरातील हनुमान गणेश मंडळाने यंदा पारंपरिक वारकरी संप्रदायाच्या पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढत भक्ती, संस्कृती आणि सामाजिक सलोख्याचा संदेश दिला.

 

दि. २५ सप्टेंबर २०२६ रोजी शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील वडगाव रासाई, परभणेवाडी, ता. शिरूर, जि. पुणे येथे हनुमान गणेश मंडळाच्या वतीने गणेश विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. या मिरवणुकीत DJ आणि मोठ्या आवाजातील ध्वनिक्षेपकाला पूर्णपणे फाटा देण्यात आला. त्याऐवजी टाळ-मृदंगाचा गजर, भजन, अभंग आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली.

 

गणरायाच्या भक्तीमय वातावरणात पारंपरिक वाद्यांच्या साथीने निघालेल्या या मिरवणुकीने ग्रामस्थांचे लक्ष वेधून घेतले. उत्सवातील आनंद कायम ठेवत ध्वनिप्रदूषण टाळण्याचा आणि आपल्या पारंपरिक संस्कृतीचे जतन करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

 

दरम्यान, शिरूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विनोद पाटील यांनी मिरवणुकीस प्रत्यक्ष भेट देऊन हनुमान गणेश मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे कौतुक केले. त्यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा सत्कारही केला. तसेच पोलीस निरीक्षक विनोद पाटील हे स्वतः मिरवणुकीत सहभागी झाले आणि मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच ग्रामस्थांशी संवाद साधला.

 

यावेळी गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून भक्ती, संस्कृती, सामाजिक एकोपा आणि शांततेचा संदेश देणारा उत्सव असल्याचे सांगण्यात आले. पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणूक काढल्यामुळे ध्वनिप्रदूषण कमी करण्यास तसेच परिसरात शांततामय वातावरण राखण्यास मदत होते, असा संदेशही देण्यात आला.

 

शिरूर पोलीस स्टेशनच्या वतीने हनुमान गणेश मंडळाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक करण्यात आले. तसेच शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील इतर गणेश मंडळांनीही टाळ-मृदंग, भजन, अभंग आणि वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीने गणेश विसर्जन मिरवणुका आयोजित करून पर्यावरणपूरक आणि शांततामय गणेशोत्सवाचा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन करण्यात आले.

DJच्या वाढत्या वापराच्या पार्श्वभूमीवर हनुमान गणेश मंडळाने घेतलेला हा निर्णय धार्मिक परंपरा, सामाजिक सलोखा आणि शांततेचा संदेश देणारा ठरला असून, गणेशोत्सव साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतीला नव्याने उजाळा मिळाला आहे.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *