लाखो भाविकांच्या उपस्थितीत काल्याच्या व पाऊलघडीच्या कीर्तनाने भाद्रपद गणेशोत्सवाची भक्तिमय वातावरणात सांगता

भाद्रपद गणेशोत्सवाची काल्याच्या व पाऊलघडीच्या कीर्तनाने भक्तिमय वातावरणात सांगता

Rjnews 27 मराठी – रमेश बनसोडे 

रांजणगाव गणपती : अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री महागणपती देवस्थानचा भाद्रपद गणेशोत्सव यंदा विविध धार्मिक कार्यक्रमांनी आणि भक्तिमय वातावरणात उत्साहात पार पडला. उत्सवाच्या सांगतेनिमित्त ह.भ.प. परमेश्वर महाराज दंडवते (देवदैठण) यांच्या काल्याच्या व पाऊलघडीच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर मानकरी व सेवेकऱ्यांना बिदागी वाटप करून उत्सवाची सांगता करण्यात आली.

 

भाद्रपद गणेशोत्सव काळात श्रींच्या मुक्तद्वार दर्शनाचा लाखो भाविकांनी लाभ घेतला. परंपरेनुसार दररोज पालखी आगमनानंतर श्रींची महापूजा देवस्थान ट्रस्टचे मुख्यविश्वस्त ओमकार देव यांच्या हस्ते करण्यात आली. अभिषेक, सहस्रावर्तने, चार द्वारयात्रा, सनई वादन, ढोल-ताशा पथकाची मिरवणूक, सांप्रदायिक आरत्या, भजनी मंडळांचे कार्यक्रम तसेच भाविकांच्या दंडवती यांसह विविध धार्मिक कार्यक्रमांनी मंदिर परिसर भक्तिमय झाला.

 

भाविकांसाठी देवस्थान ट्रस्टच्या वतीने पिण्याचे पाणी, मोफत महाप्रसाद, सुसज्ज दर्शनरांग आणि आरोग्य तपासणीसह विविध सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सहकार्याने सुमारे २ हजार ५०० भाविकांची आरोग्य तपासणी करण्यात आली, तर ३ हजार भाविकांना चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

 

यात्राकाळात सुरक्षेच्या दृष्टीने ड्रोन कॅमेरे व सीसीटीव्ही यंत्रणेचा वापर करण्यात आला. रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मंदिर व परिसरातील आकर्षक फुलांची सजावट आणि नेत्रदीपक विद्युत रोषणाईने भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले.

 

उत्सव यशस्वी करण्यासाठी देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील, मुख्यविश्वस्त ओमकार देव, उपाध्यक्ष संदीप दौंडकर, सचिव तुषार पाचुंदकर पाटील, खजिनदार विजय देव, चेअरमन दत्ताशेठ पाचुंदकर पाटील, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, पांडुरंग चोरगे, हिशोबणीस संतोष रणपिसे, जनसंपर्क अधिकारी रमाकांत शेळके यांच्यासह देवस्थान कर्मचारी, पोलीस कर्मचारी, मानकरी, सेवेकरी व ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले. यंदाचा भाद्रपद गणेशोत्सव उत्साहपूर्ण आणि निर्विघ्नपणे पार पडल्याचे देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा स्वातीताई पाचुंदकर पाटील यांनी सांगितले.

संपादक - रमेश मनोहर बनसोडे
Author: संपादक - रमेश मनोहर बनसोडे

जाहिरात व बातमीसाठी संपर्क -, 9359541560

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Verified by MonsterInsights