कान्हूर मेसाईच्या विद्याधाम शाळेमध्ये नवशैक्षणिक वर्षाचा जल्लोष; शिक्षण सहसंचालक हरून आतार यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह झाला द्विगुणित.

कान्हूर मेसाईच्या विद्याधाम शाळेमध्ये नवशैक्षणिक वर्षाचा जल्लोष; शिक्षण सहसंचालक हरून आतार यांच्या उपस्थितीने विद्यार्थ्यांचा उत्साह झाला द्विगुणित.

 

पुणे जिल्हा

विवेकानंद फंड 

 

नवीन स्वप्ने, नव्या आशा आणि ज्ञानप्राप्तीच्या नव्या प्रवासाची सुरुवात करणारा शाळेचा पहिला दिवस उत्साह, आनंद आणि प्रेरणेच्या अविस्मरणीय क्षणांनी उजळून निघाला. महाराष्ट्र राज्य, शिक्षण विभाग सहसंचालक हरून आतार यांच्या प्रमुख उपस्थितीमुळे हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरला.

विद्यालय परिसर रंगीबेरंगी सजावटीने आणि आकर्षक स्वागत कमानींनी सजला होता. नवागत विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात आणि टाळ्यांच्या कडकडाटात जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना गुलाबपुष्पे व नवीन पाठ्यपुस्तके देऊन त्यांच्या शैक्षणिक वाटचालीस मंगल शुभेच्छा देण्यात आल्या.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्या विकास मंडळाचे सचिव सदाशिवराव पुंडे होते. विद्यालयाचे प्राचार्य विनोद शिंदे यांनी प्रास्ताविकातून गतवर्षीच्या शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक उपक्रमांचा आढावा घेत विद्यालयाच्या यशस्वी वाटचालीची माहिती दिली.

मार्गदर्शन करताना शिक्षण सहसंचालक हरून आतार यांनी विद्यार्थ्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचा आणि त्यासाठी सातत्याने परिश्रम करण्याचा मंत्र दिला. “गुणवंत विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक शाळा प्रयत्नशील असते; मात्र कमी गुणवत्ता असलेल्या विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विद्याधाम विद्यालयाने सुरू केलेले विशेष वर्ग हे खऱ्या अर्थाने समाजाभिमुख आणि कौतुकास्पद कार्य आहे,” अशा शब्दांत त्यांनी विद्यालयाच्या उपक्रमांचे विशेष अभिनंदन केले. सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुणे जिल्हा बबनदादा शिंदे

सरपंच बंडू पुंडे व बापूसाहेब ननवरे यांनी विद्यार्थ्यांना नवीन शैक्षणिक वर्षासाठी शुभेच्छा देत जिद्द, शिस्त आणि सातत्य यांचा अंगीकार करण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमास सरपंच आशिया तांबोळी, बाळासाहेब पुंडे, पोपटराव तळोले, रमेश खर्डे, अनिल चौधरी, रतन तळोले, दत्तात्रय पुंडे, सुभाष गावडे, दत्तात्रय खोडदे, अल्ताफ तांबोळी, प्रवीण बांदल, चंद्रकांत लोंढे, उमेश रुपनेर, नवनाथ खैरे, परमेश्वर दंडवते यांच्यासह पालक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

संस्थेच्या अध्यक्षा अंजलीताई घोलप यांच्या वतीने विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले. त्यामुळे नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद अधिकच खुलून दिसत होता. माझा शाळेतील पहिला दिवस हा सेल्फी पॉईंट विद्यार्थ्यांसाठी कुतूहलाचा विषय ठरला. विद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले कर्मचारी वृंद यांनी कार्यक्रमाचे सुंदर नियोजन केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश चव्हाण यांनी केले, तर पर्यवेक्षक मनोज धुमाळ यांनी उपस्थितांचे आभार मानले. उत्साह, प्रेरणा आणि आनंदाने भरलेला हा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *