खोबऱ्याच्या चोरीसाठी अपघाताचा बनाव; दौंड पोलिसांनी उघड केला कट 6 लाख 68 हजारांचे 3615 किलो खोबरे जप्त; चार आरोपी अटकेत

खोबऱ्याच्या चोरीसाठी अपघाताचा बनाव; दौंड पोलिसांनी उघड केला कट
6 लाख 68 हजारांचे 3615 किलो खोबरे जप्त; चार आरोपी अटकेत

प्रतिनिधी- योगेश राऊत

चिंकमंगळूर (कर्नाटक) येथून पुण्यात विक्रीसाठी आणण्यात येत असलेल्या खोबऱ्याच्या मालाचा अपहार करून अपघाताचा बनाव रचल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यात उघडकीस आला आहे. या प्रकरणात दौंड पोलिसांनी चार आरोपींना अटक करून तब्बल 6 लाख 68 हजार 775 रुपये किमतीचे 3615 किलो खोबरे जप्त केले आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भरत मारुल सिद्धाप्पा (रा. चिंकमंगळूर, कर्नाटक) यांनी त्यांचा 3615 किलो वजनाचा खोबऱ्याचा माल आयशर टेम्पो (क्र. MH 47 AS 5368) मधून पुण्यातील गुलटेकडी येथे विक्रीसाठी पाठविला होता. हा माल चालक मनोज आंध्रेश बनसोडे (रा. बारागाव नांदूर, ता. राहुरी, जि. अहिल्यानगर) याच्या ताब्यात देण्यात आला होता.

दरम्यान, 19 मे 2026 रोजी सकाळी साडेसहाच्या सुमारास चालक मनोज बनसोडे याने फिर्यादीला दूरध्वनी करून कुरकुंभ (ता. दौंड) येथील सोलापूर-पुणे महामार्गावर हॉटेल अनन्यासमोर टेम्पोचा अपघात झाल्याची माहिती दिली. तसेच टेम्पो पलटी झाल्यानंतर त्यातील खोबरे अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याचे सांगितले.

घटनेची माहिती मिळताच दौंड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. प्राथमिक तपासादरम्यान पोलिसांना या प्रकाराबाबत संशय आल्याने अधिक सखोल चौकशी करण्यात आली. पोलिसांनी चालक मनोज बनसोडे यास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने साथीदार सुनील दत्तात्रेय लावरे, अनिकेत रावसाहेब पवार आणि तुषार लक्ष्मण जगताप (सर्व रा. राहुरी, जि. अहिल्यानगर) यांच्या मदतीने टेम्पोतील खोबरे दुसऱ्या वाहनात भरून अपहार केल्याची कबुली दिली.

तसेच चोरीचा प्रकार लपविण्यासाठी मुद्दाम अपघाताचा बनाव रचल्याचे तपासात निष्पन्न झाले. याप्रकरणी दौंड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. 329/2026 अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम 316(2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते. या पथकाने आरोपींना ताब्यात घेऊन अटक केली असून गुन्ह्यातील सर्व खोबरे जप्त करण्यात आले आहे. आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रुपेश कदम, पोलीस उपनिरीक्षक बिद्री, पोलीस हवालदार नितीन बोराडे, सुभाष राऊत, धनाजी गाढवे, अंतुल पठाण, अमीर शेख, निखिल जाधव, किरण पांढरे, संजय कोठावळे, गोरख हजारे, सोमनाथ चौंडे, पवन माने आणि महादेव जाधव यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *