प्रतिनिधी – अल्लाउद्दीन अलवी
श्रीगोंदा (अहिल्यानगर) – तालुक्यातील हंगेवाडी येथे साकळाई उपसा जलसिंचन योजना रद्द करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचा भव्य मेळावा पार पडला. महाराष्ट्र शासनाने ही योजना स्थानिक शेतकऱ्यांच्या संमतीशिवाय लादल्याचा आरोप करत, “घोड बचाव” या मुद्द्यावर शेतकरी एकवटले.
चिंचणी-घोड धरण साखळाई उपसा जलसिंचन योजनेमुळे घोड पाणलोट क्षेत्रातील शेतकऱ्यांचे हक्काचे पाणी अन्य भागाकडे वळवले जाणार असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी एकत्र येत “घोड बचाव कृती समिती”ची स्थापना केली असून, या समितीच्या माध्यमातूनच हंगेवाडी येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.
मेळाव्यात श्रीगोंदा सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान संचालक श्रीनिवास घाडगे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “घोड पाणलोट क्षेत्रात आधीच पाण्याची तीव्र टंचाई आहे. तरीही कागदोपत्री या भागात पाण्याची मागणी नसल्याचे दाखवून धरणातील शिल्लक पाण्यावर साकळाई योजना राबवली जात आहे. यामुळे स्थानिक शेतकऱ्यांना कायमस्वरूपी पाण्यापासून वंचित राहावे लागेल.”
या योजनेमुळे इतर भागांना लाभ होणार असला, तरी घोड खोऱ्यातील शेतकऱ्यांच्या हक्कांवर गदा येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे शासनाने तातडीने या योजनेचा पुनर्विचार करून ती रद्द करावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली.
या मेळाव्यास घोड बचाव कृती समितीचे अध्यक्ष टिळक भोस, रामभाऊ रायकर, स्मितल वाबळे, वागंदरी येथील विकास सोसायटीचे चेअरमन राजेंद्र नागवडे, मांडे, उंडे, सरपंच सुनील फलके, तंटामुक्ती अध्यक्ष भाऊसाहेब खळदकर, माजी सरपंच नितीन फलके, अशोक फराटे, सोमनाथ चव्हाण, अमित फलके यांच्यासह परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.
मेळाव्यात “घोड बचावासाठी शेतकरी एकत्र या”, “साकळाई जलउपसा योजना रद्द करा” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. शेतकऱ्यांनी एकजूट दाखवत पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही दिला.
कार्यक्रमाचा समारोप शेतकरी एकतेच्या घोषणांनी उत्साहात करण्यात आला.




