पुण्यात ११ तास मुसळधार पावसाचा तडाखा; वाहतूक ठप्प, शाळांना सुट्टी

पुण्यात ११ तास मुसळधार पावसाचा तडाखा; वाहतूक ठप्प, शाळांना सुट्टी  

पुणे शहरासह आसपासच्या परिसरात रविवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाने नागरिकांचे जनजीवन विस्कळीत केले आहे. सलग अकरा तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे शहरातील अनेक सखल भाग जलमय झाले असून, वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुणे–सोलापूर महामार्ग पाण्याखाली गेल्याने नायगाव–यवत मार्गावर गाड्यांच्या लांबलचक रांगा लागल्या. उरुळी कांचन परिसरात मध्यरात्रीपासून मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने नायगाव फाटा येथील पुलावरून पाणी वाहू लागले. रात्री दीड वाजल्यापासून हा मार्ग बंद असल्याने पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली. यामुळे नायगाव ते यवतपर्यंत प्रचंड कोंडी झाली असून, महामार्गावर अनेक गाड्या बंद पडल्या आहेत. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू ठेवले असले तरी मुसळधार पावसामुळे अडचणी येत आहेत, अशी माहिती उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शंकर पाटील यांनी दिली.

शहरातील आळंदी, वाघोली, केसनंद फाटा या परिसरातही रस्त्यांवर पाणी साचल्याने प्रचंड कोंडी झाली. यामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पुणेकरांना मनस्तापाला सामोरे जावे लागले आहे.

दरम्यान, खडकवासला धरण क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे सकाळी १० वाजता धरणातून १४ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. महापालिका प्रशासन आणि पाटबंधारे विभाग यांच्यात सतत संपर्क ठेवून खबरदारीचे उपाय केले जात आहेत. रविवारी मध्यरात्रीपासून महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन पथका शहरातील विविध भागांत तैनात आहेत.

पावसाचा फटका शिक्षण क्षेत्रालाही बसला असून, लोणी–काळभोर आणि हडपसर परिसरातील बहुतेक शाळांना सोमवारी सुट्टी जाहीर करण्यात आली.

सध्या परिस्थिती तितकी गंभीर नसली तरी मुसळधार पावसामुळे वाहतूक ठप्प झाली आहे. नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *