केडगाव रेल्वे स्टेशनवर आरक्षण कक्षाचा शुभारंभ – प्रवाशांच्या अपेक्षा अजूनही अपूर्ण

केडगाव रेल्वे स्टेशनवर आरक्षण कक्षाचा शुभारंभ – प्रवाशांच्या अपेक्षा अजूनही अपूर्ण

दौंड तालुक्यातील केडगाव रेल्वे स्टेशन हे गेल्या काही वर्षांपासून सतत प्रवाशांच्या मागण्या, सुविधा आणि पुनर्विकास यामुळे चर्चेत आहे. अमृत भारत योजनेअंतर्गत या स्थानकाचे मोठ्या प्रमाणात आधुनिकीकरण करण्यात आले. याचाच एक भाग म्हणून आज, सोमवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता केडगाव रेल्वे स्टेशनवर प्रवाशांसाठी आरक्षण कक्षाचे उद्घाटन करण्यात आले.

या वेळी स्थानक प्रबंधक मुकेश कुमार सिंग, बुकिंग सुपरवायझर रेखा लोंढे व अभय कुमार, पॉईंट्समन मधुकर पी. गायकवाड, तसेच रेल्वे सुरक्षा बलाचे जवान डी. डी. माळी उपस्थित होते. शुभारंभाचा मान केडगाव येथील बांधकाम व्यावसायिक उमेश बारवकर यांना मिळाला. त्यांनी या नवीन आरक्षण कक्षातून पहिले रेल्वे तिकीट काढून या उपक्रमाचा प्रारंभ केला.
प्रवाशांची स्थिती : सुविधा असूनही त्रास कायम
आज केडगाव गावासह आसपासच्या १२-१३ गावांचा रेल्वे प्रवासासाठी मोठा आधार या स्थानकावर आहे. दररोज ३ ते ४ हजार प्रवासी येथून रेल्वेने प्रवास करतात. तरीदेखील सकाळी नववीची बारामती डेमो गाडी गेल्यानंतर संध्याकाळी ५:५० वाजेपर्यंत एकाही पॅसेंजर गाडीचा थांबा नसल्यामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होतात.

विद्यार्थी, कामगार, व्यापारी अशा सर्व प्रवाशांना दिवसभराचा मोठा वेळ वाया घालवावा लागतो. परिणामी, आरक्षण कक्षाचे उद्घाटन झाले असले तरी प्रवाशांच्या मूलभूत मागण्या अजूनही प्रलंबित आहेत.

प्रवासी संघटनांचे पत्रव्यवहार
प्रवासी संघटनांनी या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. डीआरएम कार्यालयापासून खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत ही मागणी पोहोचली असली तरी अद्याप कोणतेही ठोस निर्णय झालेले नाहीत. प्रवाशांचा आक्रोश वाढत असून रेल्वे प्रशासनाने याकडे त्वरित लक्ष देण्याची मागणी होत आहे.
प्रशासनाची पुढची पावले काय?
अमृत भारत योजनेतून स्थानकाचा पुनर्विकास झाला, आधुनिक सोयी उपलब्ध झाल्या, परंतु प्रवाशांना प्रत्यक्ष उपयोगी पडणाऱ्या गाड्यांची संख्या, वेळा आणि थांबे यावर निर्णय न झाल्यास या कामांचा फायदा मर्यादित राहणार आहे.

स्थानिकांचा ठाम आग्रह आहे की, रेल्वे प्रशासनाने केवळ पायाभूत सुविधा नव्हे तर प्रवाशांच्या खऱ्या गरजा लक्षात घेऊन वेळापत्रकात बदल करावा. अन्यथा प्रवाशांच्या समस्या जशाच्या तशा राहतील.
विकास साळुंके, दौंड तालुका प्रतिनिधी
आर जे न्यूज २७ मराठी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *